मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Iran Blast : इराणमध्ये भीषण स्फोटात १०३ ठार; दहशतवादी कृत्य असल्याचा आरोप

Iran Blast : इराणमध्ये भीषण स्फोटात १०३ ठार; दहशतवादी कृत्य असल्याचा आरोप

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 03, 2024 08:48 PM IST

इराणचे जनरल दिवंगत कासिम सुलेमानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कबरीजवळ आयोजित कार्यक्रमात एकापाठोपाठ दोन भयंकर स्फोट झाले आहे. यात १०३ नागरिक ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Iran Blasts: Iranian emergency services arrive at the site where two explosions in quick succession.
Iran Blasts: Iranian emergency services arrive at the site where two explosions in quick succession. (AFP)

इराणच्या लष्कराचे जनरल, दिवंगत कासिम सुलेमानी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथि निमित्त आयोजित कार्यक्रमात झालेल्या भीषण स्फोटात १०३ नागरिक झाल्याचं वृत्त आहे. २०२० साली इराकच्या दौऱ्यावर असताना बगदादमध्ये अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात कासिम ठार झाले होते. या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ आज दक्षिण इराणमध्ये केरमान प्रांतात कासिम यांच्या कबरीजवळ शेकडो नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांमध्ये १०० हून अधिक नागरिक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत.

इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या परदेशी ऑपरेशन्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांना दक्षिण इराणमधील केरमान येथील साहेब अल-जमान मशिदीजवळ दफन करण्यात आले होते. आज त्यांची पुण्यतिथी होती. 

स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना इराणच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमचे सदस्य बाहेर काढत असून प्रचंड गर्दीमुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याचं केरमान प्रांताचे रेड क्रिसेंट बचावपथकाचे प्रमुख रेझा फल्लाह यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले.

केरमान येथे हजारो शोकाकूल नागरिक कासिम सुलेमानी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी झाले होते, असं वृत्त इराणच्या सरकारी टीव्हीने दिले आहे. स्फोटाच्या ठिकाणी पळापळ झाल्याने चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दृष्य टीव्हीवर दाखवण्यात आले. परंतु स्फोट नेमके कशामुळे झाले याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवल्याचा आरोप इराणने केला आहे.

दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक गॅस कॅनिस्टरचा स्फोट झाल्याचे वृत्त नूरन्यूजने दिले आहे. तर हे स्फोट दहशतवादी हल्ल्यामुळे झाले की गॅस सिलिंडरमुळे, हे अद्याप स्पष्ट नाही' असं वृत्त एका स्थानिक अधिकाऱ्याचा हवाला देऊन इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी जारी केले आहे. 

इराणच्या मध्यवर्ती भागात असलेल्या केरमन प्रांतात १५ मिनिटांच्या आत अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. मात्र हे स्फोट दहशतवादी हल्ल्यामुळे झाले की गॅस स्फोटामुळे हे अद्याप स्पष्ट नाही, असं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

कोण आहेत कासिम सुलेमानी कासिम

कासिम सुलेमानी हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या परदेशी ऑपरेशन्सचे प्रमुख होते. इराणच्या राजकारणात एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांना स्थान होते. सुलेमानी २०२० साली इराकच्या गुप्त दौऱ्यावर असताना बगदाद विमानतळाबाहेर अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाले होते. २०२० मध्ये त्यांच्या निधनानंतर इराण आणि अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली होती.

WhatsApp channel

विभाग