तेलंगणामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे भारत मातेच्या रुपातील पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरमध्ये सोनिया यांना देवतेच्या रुपात रत्नजडित मुकुट परिधान केलेले दाखवण्यात आले आहे. पोस्टरमध्ये त्याच्या उजव्या हातावर तेलंगाणाचा नकाशा दाखवण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरवरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची ही कृती लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसेच देशातील सर्वात जुन्या पक्षाने नेहमीच त्यांचा कुटूंबाला देश आणि देशातील लोकांपेक्षा मोठं असल्याचं दाखवलं असल्याची टीका केली. काँग्रेसला भारताचा अपमान करण्याची सवय लागली आहे, असंही पूनावाला म्हणाले.
रविवारी हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक पार पडली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर हे पोस्टर लावण्यात आले होते.
सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत काँग्रेस सरकार स्थापन केल्यानंतर तेलंगणाच्या महिलांना प्रति महिना २५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ५०० रुपयात सिलिंडर गॅस व राज्य महामंडळाच्या बसेसमधून महिलांना मोफत प्रवासाचे आश्वासन दिले. सोनिया गांधी म्हणाल्या की, तेलंगणात काँग्रेसचे सरकार बनल्यास सर्व वर्गासाठी काम करेल.
संबंधित बातम्या