Bharat Ratna and politics : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आज ही माहिती दिली. त्यासोबतच माजी पंतप्रधान पीव्ही नरसिम्हाराव व शास्त्रज्ञ एमएस स्वामिनाथन यांचाही सन्मान करण्यात आलाय. एकाच वर्षी तब्बल पाच भारतरत्न जाहीर झाल्यामुळं साहजिकच त्यावरून राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी व बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना 'भारतरत्न' जाहीर झाला आहे. त्यानंतर आज आणखी तिघांना हा सन्मान मिळाला आहे. यातील चौधरी चरणसिंह यांच्या नावामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला काही दिवस उरलेले असतानाच चरणसिंह यांना भारतरत्न दिलं जाणं याचा संबंध थेट मतांशी लावला जात आहे. यामागे भाजपची राजकीय गणितं असल्याचं बोललं जात आहे.
शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असलेले चौधरी चरण सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता. याशिवाय हरियाणा, राजस्थान, पंजाबसह अनेक राज्यांतील जाट समाजाचे लोकही त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले गेलेले आहेत. देशातील शेतकरी वर्गातही चौधरी चरणसिंग यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन जाट आणि शेतकरी समाजाशी जवळीक साधण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
पंजाब आणि हरियाणातील जाट समाजात भाजपच्या विरोधी भावना आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी जयंत चौधरींना सोबत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातून चौधरी चरणसिंग यांच्या मतदारांना समाजवादी पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. चरणसिंह यांना भारतरत्न घोषित झाल्यामुळं राष्ट्रीय लोकदल आणि भाजपच्या युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जयंत चौधरी यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तसे संकेतच दिले आहेत.
केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात २०२० मध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी तब्बल वर्षभर आंदोलन केलं होतं. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला होता. त्या काळात आंदोलक शेतकरी व सरकारमध्ये तीव्र मतभेद झाले होते. भाजप समर्थकांकडून शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणूनही हिणवलं गेलं होतं. कृषी कायदे मागे घेतले गेल्यानंतर हे आंदोलन संपलं, मात्र भाजपविषयीचा रोष अद्यापही कायम आहे. २०२२ मध्ये यूपीच्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला, पण शेतकरी व जाट यांचा भाजपवरचा रोष कायम राहिला. चरणसिंह यांना भारतरत्न देऊन तो रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं मानलं जात आहे. या निर्णयामुळं भाजपला हरियाणा विधानसभा निवडणुकीतही फायदा होणार आहे.
२०१४ पासून भाजपला जाट समुदायाचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर जाट समज भाजपपासून फटकून राहू लागला. चरणसिंह यांच्या बाबतीतला आताचा निर्णय हा जाट समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न मानला जात आहे. चौधरी चरण सिंग हे पश्चिम उत्तर प्रदेश किंवा हरियाणाशी जवळीक असलेले नेते होते. ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. त्यामुळं दोन्ही प्रदेशांत त्यांच्याविषयी ममत्व आहे. त्यांचा सन्मान करून मोदींनी शेतकरी आणि जाट राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. मोदींचा हा डाव उलटवणं विरोधकांना कठीण जाणार आहे.
संबंधित बातम्या