मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Naveen Jindal Death Threats : उद्योजक नवीन जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Naveen Jindal Death Threats : उद्योजक नवीन जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 24, 2023 04:26 PM IST

Naveen Jindal Death Threats : दोन दिवसांत ५० लाख द्या नाही तर ठार मारेन, अशा धमकीचं पत्र प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदल यांना मिळालं आहे. त्यानंतर आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Naveen Jindal Death Threats
Naveen Jindal Death Threats (HT)

Naveen Jindal Death Threats : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता देशातील प्रसिद्ध उद्योजक नवीन जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं आता देशभरात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगडच्या रायपुरमधील कारागृहातील एका कैद्यानं ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता एकाच आठवड्यात दोन प्रसिद्ध व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी उद्योगपती नवीन जिंदल यांना पत्र लिहून धमकी दिली आहे. जिंदल कंपनीच्या पोस्टातून धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवीन जिंदल हे जिंदल स्टील अँड पावर लिमिटेडचे चेयरमन आहेत. येत्या ४८ तासात ५० लाख रुपये मिळाले नाही तर नवीन जिंदल यांना ठार मारू, अशी धमकी आरोपीनं पत्रातून दिली आहे. त्यानंतर आता जिंदल कंपनीत खळबळ उडाली असून उद्योगपती नवीन जिंदल यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. जिंदल यांना धमकीचं पत्र मिळाल्यानंतर कंपनीचे अधिकारी सुधीर रॉय यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी रायपुरच्या कारागृहात बंद असलेल्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कैद्याची संपूर्ण माहिती मिळाली असून त्याच्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं छत्तीसगड पोलिसांनी सांगितलं आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सपाचे आमदार अबु आझमी यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध उद्योजक नवीन जिंदल यांनाही धमकीचं पत्र मिळाल्यामुळं खळबळ उडाली आहे.

WhatsApp channel