pok people big protest : महागाईमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज आणि पिठाच्या किमती वाढल्यानंतर काश्मिरी नागरिकांचा संयम सुटला आहे. शाहबाज सरकारच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरू केली आहेत. नागरिक ऐवढे संतप्त झाले होते की त्यांच्यावर हवेत गोळीबार करण्यात आला. राजधानी मुझफ्फराबाद, दडियाल, मीरपूर आणि संहनी, सेहंसा, रावलकोट, खुर्हा. तट्टापानी आणि हत्तीन बालासह पीओकेच्या अनेक भागांमध्ये पोलिस आणि लोकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. या संघर्षात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या काश्मीर पब्लिक ॲक्शन कमिटीच्या आवाहनावर लोक शाहबाज शरीफ सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत आहेत. या समितीने विजेचे दर वाढवून जादा दराने पीठ विक्री करण्यास विरोध केला आहे. तर आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने मुझफ्फराबाद व सर्व जिल्ह्यांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. काश्मीरमधील अनेक भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झडप देखील झाली आहे. मुझफ्फराबाद, धोड्याल, कोटली आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे.
सरकारने अनेक आंदोलकांना अटक केली आहे. मात्र असे असतानाही लोक मोठ्या संख्येने पुढे आले असून त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धडियालमध्ये आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली होती, त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात काही नागरिक जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. जम्मू आणि काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JKJAAC) ने मुझफ्फराबादमध्ये पुकारलेल्या बंद आणि संपादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व हवेत गोळ्या झाडल्या. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मीरपूर इस्लामगडमध्ये आंदोलकांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक अदनान कुरेशीचा याचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानी नागरिक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ३ अब्ज डॉलर्सचे आर्थिक मदत पॅकेज मंजूर करताना लादलेल्या कडक अटींमुळे देशाच्या विविध भागांतील परिस्थिती बिकट झाली आहे. विजेचे दर वाढल्याने अडचणी वाढल्या असून पाकिस्तानमधील लोक या विरोधात आता रस्त्यावर उतरले आहेत.
संबंधित बातम्या