poet munawwar rana dies at 71 after prolonged illness: प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी मध्यरात्री जगाचा निरोप घेतला. रात्री उशिरा लखनौच्या पीजीआय रुग्णालयात उपचार घेत असतांना हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७१ वर्षांचे होते. राणा गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. तसेच त्यांच्यावर लखनौच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते. ते किडनी आणि हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते.
मुनव्वर राणा हे प्रसिद्ध उर्दू कवी होते. त्यांनी अनेक गझल लिहिल्या आहेत. त्यांचा स्पष्टवक्ते आणि निर्भयपणा हा त्यांच्या कवितांमधून देखील दिसून यायचा. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगत २०१४ मध्ये त्यांनी उर्दू साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला होता. कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी शपथ देखील त्यांनी घेतली होती.
रविवारी उशिरा लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते किडनी आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते.
कवी मुनव्वर राणा हे उत्तर प्रदेशच्या राजकीय घडामोडींमध्येही सक्रिय होते. त्यांची मुलगी सुमैया अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाची (एसपी) सदस्य आहे. राणा अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादातही सापडले आहेत.
तालिबानची बाजू घेतल्याबद्दल आणि त्यांची महर्षी वाल्मिकीशी तुलना केल्याबद्दल तसेच शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येचे समर्थन केल्याबद्दल राणा यांना टीकेचा सामना करावा लागला होता. सॅम्युअल पॅटी यांची २०२० मध्ये पॅरिसमध्ये प्रेषित मोहम्मद याच्याबद्दल झालेल्या वादातून हत्या करण्यात झाली होती.