मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi on Nepotism: घराणेशाहीचा द्वेष करायलाच हवा, कारण… मोदींचा पुन्हा हल्लाबोल

Narendra Modi on Nepotism: घराणेशाहीचा द्वेष करायलाच हवा, कारण… मोदींचा पुन्हा हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 15, 2022 10:54 AM IST

Narendra Modi on Nepotism: स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला.

Narendra Modi
Narendra Modi (PTI)

Narendra Modi on Nepotism: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. घराणेशाहीचा द्वेष करायलाच हवा, असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.

पंतप्रधानपदी येण्याच्या आधीपासूनच नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा लावून धरला आहे. देशाच्या राजकारणात वर्षानुवर्षे विशिष्ट घराण्यांचं वर्चस्व आहे. महाराष्ट्रात ठाकरे-पवार, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव-पासवान, उत्तर प्रदेशात सप-बसप, जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती व अब्दुल्ला, हरयाणात चौटाला, पंजाबमध्ये बादल, आंध्र प्रदेशात रेड्डी, तेलंगणात चंद्रशेखर, ओडिशात पटनायक आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबांचा दबदबा आहे. या सगळ्यांच्या विरोधात नरेंद्र मोदी प्रत्येक निवडणूक प्रचारात बोलत आले आहेत. आज लाल किल्ल्यावरून बोलताना त्यांनी घराणेशाहीवर परखड भाष्य केलं.

‘घराणेशाही हे देशाच्या समोरचं एक आव्हान आहे. घराणेशाहीबद्दल द्वेष आणि तिरस्कार वाटलाच पाहिजे. या घराणेशाहीनं देशातील प्रतिभा मारून टाकली आहे, असं मोठं विधान मोदी यांनी केलं. 'भाऊ, पुतण्या आणि भाच्याच्या घराणेशाहीबद्दल मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा मी केवळ राजकारणावर बोलतो असं लोकांना वाटतं. पण दुर्दैवानं राजकारणातील या घराणेशाहीनं देशातील सर्वच संस्थांमध्ये घराणेशाहीला खतपाणी घातलं आहे. त्यामुळं खरी प्रतिभा पुढं येणं बंद झालं आहे, असं मोदी म्हणाले.

'घराणेशाहीच्या मुद्द्यावर सतत चर्चा होत राहावी असं मला वाटतं. भाई-भतीजावादाच्या राजकारणाच्या विरोधात मला तरुणाईची साथ हवी आहे. हे देशासमोरचं एक आव्हान आहे, विकृती आणि आजार आहे. याच्या विरोधात वेळीच लढा दिला नाही तर ते विक्राळ रूप धारण करतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, हौतात्म्य पत्करणाऱ्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

IPL_Entry_Point