Modi Address the Nation : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि आता शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच थेट देशवासियांना संबोधित करणार आहेत. यापूर्वी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ निरपराध लोकांच्या निर्घृण हत्येनंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. यापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्याबरोबरच पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एकापाठोपाठ एक बैठका आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आता देशवासियांना संबोधित करणार आहेत.
याआधी पंतप्रधान मोदी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांच्या सतत संपर्कात होते. गेल्या आठवड्यात ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून त्यांनी लष्करप्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. सोमवारी तिन्ही लष्करप्रमुख पंतप्रधान मोदीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सीडीएस अनिल चौहान उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांच्यात ही चर्चा होणार आहे, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
याआधी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे लष्कराच्या कारवाईची माहिती देशवासियांपर्यंत पोहोचवत होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पत्रकार परिषदेचे प्रमुख चेहरे होते. यानंतर रविवारी भारतीय लष्कराने आपली जबाबदारी स्वीकारली. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याव्यतिरिक्त एअर मार्शल ए. के. भारती यांनी या ऑपरेशनशी संबंधित आणखी काही महत्त्वाची माहिती प्रसारमाध्यमांशी शेअर केली आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट करण्यात आले. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत मोठी कारवाई करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनास पाठवले. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन अण्वस्त्रधारी देश शस्त्रसंधीकडे वळले आहेत. पाकिस्तानकडून नेहमीच शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आले आहे. याला भारताकडून नेहमी जशास तसे प्रत्यूत्तर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. भारत-पाकिस्तान युद्धविरामाबद्दल ते काय बोलणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या