PM Narendra Modi visit Ramsetu place : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिराला भेट देत अभिषेक केला होता. यानंतर त्यांनी मंदिरात पूजा देखील केली. यानंतर आज त्यांनी अरिचल मुनई येथे भेट देत जिथे राम सेतू बांधला गेला होता त्या ठिकाणी जात पूजा केली. या ठिकाणी मोठी यांनी फुले देखील वाहिली. या बाबतचा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला असून तो व्हायरल देखील होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा केली. अरिचल मुनई येथेही त्यांनी आज भेट दिली. अरिचल मुनई येथील समुद्र किनाऱ्यावर राम सेतू बांधला गेला होता अशी आख्याईका आहे. कोठंडाराम म्हणजे धनुष्य असलेला राम. धनुषकोडी येथे श्री राम यांनी रावणाचा पराभव करण्याची शपथ घेतली होती. या पवित्र मातीतूनच ते लंकेकडे निघाले.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरंगम आणि रामेश्वरममधील श्री रंगनाथस्वामी आणि अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरांना भेट दिली होती. अग्नितीर्थ समुद्रकिनारी स्नान केल्यानंतर त्यांनी येथील भगवान रामनाथस्वामी मंदिरात पूजा केली. रुद्राक्षाची जपमाळ परिधान केलेल्या मोदींनी तामिळनाडूतील रामनाथस्वामी या प्राचीन शिव मंदिरात पूजा केली. पुरोहितांनी मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. मंदिरात झालेल्या भजनातही मोदी सहभागी झाले. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम बेटावर असलेले शिवमंदिरही रामायणाशी संबंधित आहे. प्रभू श्री राम यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. मोदी यांनी या ठिकाणी प्रभू राम आणि सीता देवीची पूजा केली.
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मंदिरांना भेटी देत आहेत. अयोध्येच्या माजी राजाचे भव्य निवासस्थान असलेले राज सदन, येथील विविध मंदिरे आणि इतर इमारती या अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने दिव्यांनी उजळून निघाल्या आहेत. या मंदिरनगरीत दिवाळी सारखे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्या या प्राचीन शहराला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. विशेषतः राम पथ आणि धर्मपथाची सजावट पाहण्यासारखी आहे. 'राम आयेंगे', 'अवध में राम आये हैं' या सारखी गाणी अयोध्येच्या गल्लीबोळात ऐकू येत आहेत. मंदिरातील इमारती भगव्या पताकांनी सजल्या आहेत.