PM Narendra Modi in Mahakumbh : महाकुंभ २०२५ मध्ये आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे वैदिक मंत्रोच्चारात त्रिवेणी संगमात स्नान केलं. यावेळी सीएम योगी आदित्यनाथ आणि अनेक संत उपस्थित होते. संगम स्नानानंतर पंतप्रधान मोदी यांनी विधिवत गंगापूजन केले. याआधी त्यांनी सीएम योगी यांच्यासोबत बोटीतून गंगा विहार देखील केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजमधील बमरौली विमानतळावर पोहोचल्यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल, सीएम योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचले. तेथून त्यांचा ताफा चोख बंदोबस्तात अरैलच्या व्हीआयपी घाटात पोहोचला. अरैल घाटातून पंतप्रधान मोदी हे बोटीने संगम नोज येथे पोहोचले. यावेळी सीएम योगी देखील त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदी यांचे संगमाच्या काठावर उभ्या असलेल्या भाविकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोदी यांनी देखील हात हलवून व नमस्कार करून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगम नोज येथे पोहोचून वैदिक मंत्रोच्चारात पवित्र त्रिवेणीत स्नान केले. यानंतर त्यांनी त्यांनी गंगा मातेची पूजा केली. पंतप्रधानांनी संगमावर साधू-संतांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. संगमात स्नान केल्यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा संगम नोज ते अरैल घाटापर्यंत बोटीवर बसले. पंतप्रधान अरैल घाटातून हेलिकॉप्टरने बमरौली विमानतळाकडे रवाना होतील आणि त्यानंतर नवी दिल्लीला रवाना होतील. महाकुंभ २०२५ मध्ये पंतप्रधान दुसऱ्यांदा दाखल झाले आहेत. तत्पूर्वी ते १३ डिसेंबर २०२४ रोजी महाकुंभनगरीत आले होते. त्यानंतर त्यांनी संतांची भेट घेऊन मेळा परिसरातील व्यवस्थेची माहिती घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान भाविकांवर परिणाम होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. पंतप्रधानांचा दौराही अत्यंत कमी कालावधीचा (सुमारे एक तास) होता. संगम परिसरात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. सर्वसामान्य भाविकांना मोदी यांच्या दौऱ्याचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
संबंधित बातम्या