महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; ५६ वर्षानंतरच्या गयाना दौऱ्याला महत्व
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; ५६ वर्षानंतरच्या गयाना दौऱ्याला महत्व

महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; ५६ वर्षानंतरच्या गयाना दौऱ्याला महत्व

Nov 12, 2024 11:58 PM IST

ब्राझीलपूर्वी पंतप्रधान मोदी १६-१७ नोव्हेंबरला नायजेरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या १७ वर्षांत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच आफ्रिकन देश दौरा असेल.

मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर
मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर (PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेतही ते सहभागी होतील. त्यासाठी मोदी  १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ब्राझील दौऱ्यावर जाणार आहे. तेथे पंतप्रधान जी-२० परिषदेत जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करतील आणि नवी दिल्ली घोषणेच्या परिणामांवर भर देतील. त्यानंतर ते आफ्रिकन देश नायजेरिया आणि दक्षिण अमेरिकी देश गयाना ला भेट देतील. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत मोदींचा मुख्य सहभाग असणार आहे. जी-२० परिषदेचे विद्यमान अध्यक्ष ब्राझील आणि पुढील वर्षी होणाऱ्या शिखर परिषदेचे यजमानपद भूषविणारा दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर भारत जी-२० त्रिकुटाचा भाग आहे.

ब्राझीलपूर्वी पंतप्रधान मोदी १६-१७ नोव्हेंबरला नायजेरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या १७ वर्षांत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच आफ्रिकन देश दौरा असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी नायजेरियाच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि नायजेरिया यांच्यातील सामरिक भागीदारीचा आढावा घेण्याबरोबरच पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संबंध वाढविण्याच्या पुढील मार्गांवर चर्चा करतील.

दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते भारतीय समुदायाच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. भारत आणि नायजेरिया हे २००७ पासून आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सहकार्यासह सामरिक भागीदार आहेत. जवळपास २०० भारतीय कंपन्यांनी नायजेरियात २७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

१९६८ पासून भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच गयाना दौरा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान गयाना दौऱ्यावर जाणार आहेत. १९६८ नंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असेल. राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत आहे. या दौऱ्यात मोदी अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते गायनीजच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील.

गयाना येथे असताना मोदी जॉर्जटाऊन येथे होणाऱ्या दुसऱ्या कॅरिकॉम-इंडिया शिखर परिषदेत सहभागी होतील आणि या क्षेत्राशी भारताचा संबंध वाढविण्यासाठी कॅरिकॉम सदस्य देशांच्या नेत्यांशी बैठक घेतील. २०२३ मध्ये गयानाचे राष्ट्रपती अली मध्य प्रदेशातील प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते आणि त्यांना प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. मोठी गोष्ट म्हणजे गयानामधील सुमारे ४० टक्के लोकसंख्या भारतीय आहे. वसाहतवादी काळात भारत आणि गयाना हे दोन्ही देश ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर