Narendra Modi Latest Tweet : देशाच्या राजकारणातील एक महान नेते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘एक्स’च्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब हे आपल्या विचारधारेवर प्रगाढ विश्वास असलेले व त्याप्रती ठाम असलेले नेते होते, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना अभिवादन करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. लोककल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती त्यांची वचनबद्धता सर्वत्र आदरास पात्र ठरली आहे. त्यांचं नेहमीच स्मरण केलं जातं. आपल्या विचारांवर व तत्वावर ठाम असलेले ते नेते होते. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी नेहमीच योगदान दिलं.'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. अमित शहा यांनी ‘एक्स’वर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये पोस्ट लिहिली आहे. 'सनातन संस्कृती आणि राष्ट्रीयत्व या विचारधारेला आजन्म समर्पित, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यातून राष्ट्रप्रेमाला नेहमी प्राधान्य दिलं. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील. प्रखर राष्ट्रवादी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम, असं अमित शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या दोन्ही शिवसेनेचे मेळावे आज मुंबईत होत आहेत. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अंधेरी इथं मेळावा घेणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावाही आज होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मेळावे महत्त्वाचे ठरणार आहेत.
संबंधित बातम्या