Narendra Modi Podcast : ‘लहान वयातच मी घर सोडलं. त्यामुळं शाळेतल्या मित्रांशी माझा संपर्कच राहिला नाही. मला अरेतुरे करणारा कोणी राहिलेलाच नाही,’ अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
झिरोधाचे (Zerodha) सहसंस्थापक निखिल कामत (Nikhil Kamath) यांच्या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच पॉडकास्ट मुलाखत होती. बालपणीच्या आठवणींपासून राजकीय जीवनापर्यंत सर्वच प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरं दिली. ‘मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या शाळेतल्या मित्रांना बोलावून त्यांच्यासोबत गप्पा माराव्या असं मला वाटलं. मी फोन केला आणि जवळपास ३५ लोक आले, पण आमच्या बोलण्यात मैत्री नव्हती. मला त्या गप्पांचा आनंद घेता आला नाही. कारण मी त्यांच्यात मित्र शोधत होतो, पण त्यांना माझ्यात फक्त मुख्यमंत्रीच दिसला. ही दरी आजपर्यंत भरून निघालेली नाही आणि माझ्या आयुष्यात 'तू' म्हणायला कोणीच उरलं नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
'बहुतेक लोक मला अतिशय औपचारिक आणि आदराने संबोधतात. तू म्हणणारं कोणी आता माझ्या आयुष्यात नाही. 'रासबिहारी मणियार नावाचे माझे एक शिक्षक होते. ते मला पत्र लिहायचे तेव्हा माझा उल्लेख तू असा करायचे. नुकतंच वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मला 'तू' म्हणून संबोधणारे ते शेवटचे होते, असं मोदी म्हणाले.
'मी शाळेत कधीही उत्कृष्ट विद्यार्थी नव्हतो, परंतु माझे एक शिक्षक मला खूप प्रोत्साहन देत असत. मात्र, कुठलंही काम हे समरसून, मिशन म्हणून केलं पाहिजे हे मी कायम लक्षात ठेवलं, असं ते म्हणाले.
राजकारणातील यशाच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, महत्त्वाकांक्षेचा नव्हे तर ध्येयाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आजच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर महात्मा गांधीजी कुठे बसतात? ते सडपातळ होते आणि सामान्य जीवन जगत होते. तरीही ते महान ठरले. कारण त्याचं जीवन बोलत होतंं. भाषणाच्या कलेपेक्षा संवादाची कला महत्त्वाची आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
महात्मा गांधी यांच्या हातात त्यांच्यापेक्षा उंच काठी असायची, पण ते अहिंसेबद्दल बोलायचे आणि लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी टोपी कधीच घातली नाही, पण जगानं गांधी टोपी घातली. महात्मा गांधींनी राजकारण केलं, पण सत्तेत आले नाहीत. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर समाधीचं नाव राजघाट ठेवण्यात आलं, याकडं मोदींनी लक्ष वेधलं.
> गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी असंवेदनशील पद्धतीने काहीतरी बोललो होतो. चुका होतात. मी माणूस आहे, देव नाही. पण मी स्वतःसाठी काहीही करणार नाही आणि वाईट हेतूनं कधीही चुकीचं करणार नाही, हाच माझ्या जीवनाचा मंत्र आहे.
> मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे कपडे धुत असे. त्यामुळं मला तलावात जाण्याची परवानगी मिळाली होती.
> महत्त्वाकांक्षा ठेवून नव्हे, तर ध्येयानं राजकारणात उतरलं पाहिजे.
संबंधित बातम्या