काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक प्रचारासाठी बिलावर येथे एका सभेला संबोधित करताना अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे खर्गे यांना काही काळासाठी भाषण थांबवून विश्रांती घेतली होती. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खर्गे यांनी जम्मूतील एका प्रचार सभेत बोलताना चक्कर आली होती. त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती. काँग्रेस महासचिव गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, खर्गे जसरोटा येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊ लागली. त्यांना सहकाऱ्यांनी खुर्चीत बसवले . विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खर्गे जसरोटा येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते.
जम्मू-काश्मीर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र शर्मा यांनी सांगितले की, खर्गे यांना चक्कर येत होती. त्यांना एका खोलीत नेण्यात आले जिथे डॉक्टरांना तपासणीसाठी बोलावले गेले. उधमपूरमधील दुसऱ्या रॅलीला ते उपस्थित राहू शकतील की नाही, याचा सल्ला डॉक्टर देतील. खर्गे यांची उधमपूर येथे होणारी दुसरी सभा रद्द करण्यात आली. ते दिल्लीला परतले. जसरोटा मेळाव्यात बोलताना खर्गे म्हणाले, 'मला बोलायचे होते. पण चक्कर आल्याने मी खाली बसलो आहे. कृपया मला माफ करा. भाजप आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मेळाव्याच्या ठिकाणी वैद्यकीय मदत घेतल्यानंतर खर्गे म्हणाले की, मी इतक्या लवकर मरणार नाही. स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते सोडणार नाही. मी ८३ वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींना सत्तेवरून हटवत नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन.
मी तुमचं ऐकून घेईन. मी तुमच्यासाठी लढेन. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवले जात नाही तोपर्यंत राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.