PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी आपला ७४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. मोदींच्या वाढदिवसांच्या एक दिवस आधी १३ वर्षांच्या मुलीने त्यांच्यासाठी खास गिफ्ट तयार केलं आहे. या मुलीने ८०० किलो बाजरीचा वापर करून पंतप्रधान मोदींचे चित्र तयार केले आहे. हे जगातील सर्वात मोठे बाजरीपासून बनवलेले चित्र आहे आणि त्यामुळे याची जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. ही कलाकृती मुलीने १२ तासांत पूर्ण केली. प्रेस्ली शेकिना असे या मुलीचे नाव असून ती चेन्नईतील वेल्लमल शाळेची विद्यार्थिनी आहे. पंतप्रधानांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याची इच्छा व्यक्त करत तिने या प्रकल्पावर काम सुरू केले.
रिपोर्टनुसार, प्रेस्ली शेकिना हिने सकाळी साडे आठ वाजता पेंटीग सुरू करून रात्री साडे आठ वाजता पूर्ण केले. पंतप्रधान मोदींची ही कलाकृती ६०० चौरस फुटांमध्ये पसरलेली असून, आता जगातील सर्वात मोठी बाजरी पेंटिंग म्हणून ओळखली जाणार आहे. प्रेस्ली शेकिनाच्या वडिलांचे नाव प्रताप सेल्वम आणि आईचे नाव संकीर आहे. त्यांच्या मुलीच्या या कामगिरीची युनिको वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली आहे. युनिको वर्ल्ड रेकॉर्डचे संचालक आर. शिवरामन यांच्या हस्ते मुलीला प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कुटुंबियांनी शेकीनाच्या कामाचे खूप कौतुक केले आहे.
प्रेस्ली शेकिना यांचा हा प्रयत्न बाजरीच्या अनोख्या वापरावर प्रकाश टाकतो. तसेच, पंतप्रधान मोदींचा वाढदिवस खास बनवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षातर्फे १७ सप्टेंबर रोजी देशभरात 'सेवा पखवाडा' सुरू करण्यात येणार आहे. पक्षाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे. त्याअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती सेवा परमो धर्म म्हणून साजरी केली जाणार आहे. सेवा पंधरवड्यात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, छायाचित्र प्रदर्शन, विषयावर आधारित चर्चासत्रे, वृक्षारोपण मोहीम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.