Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांशी संवाद साधणार आहे. या द्वारे ते मुलांना तणावविरहित वातावरणात परीक्षा कशा द्यायच्या याच्या टिप्स देणार आहेत. आज सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी, निवडलेल्या सुमारे २,५०० विद्यार्थ्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि नवोदय विद्यालय यासारख्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळविण्यासाठी मुलांना टिप्स देणार आहे. या कार्यक्रमात सर्व सहभागी मुलांना शिक्षण मंत्रालयाकडून एक विशेष परीक्षा चर्चा किट देखील दिली जाणार आहे. याशिवाय, टॉप १० 'वेटरन एक्झाम वॉरियर्स'ना पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट देण्याची विशेष संधी देखील दिली जाणार आहे.
पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमासंदर्भात एक्सवर एक टीझर पोस्ट केला आहे. यात ते दिल्लीत एका ठिकाणी ते विद्यार्थ्यांशी परीक्षेच्या ताणाबद्दल बोलत असतांना दिसत आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "चला मुलांनो परीक्षेच्या ताणावर मात करण्यास मदत करूया. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम नक्की पहा."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमाची ही आठवी आवृत्ती राहणार आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचा वार्षिक बोर्ड परीक्षांपूर्वी परीक्षेचा तणाव कमी करने हा आहे. 'परीक्षा पे चर्चा'च्या आठव्या आवृत्तीत अभिनेत्री दीपिका पदुकोण, भूमी पेडणेकर, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी कोम आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांसारख्या सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत.
या वर्षी, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी ३.१५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याशिवाय, १९.८० लाख शिक्षक आणि ५.२० लाख पालकांनी आधीच नोंदणी केली आहे. या वर्षीच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ३६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे विद्यार्थी राज्य/केंद्रशासित प्रदेश शिक्षण मंडळांच्या सरकारी शाळांमध्ये, केंद्रीय विद्यालये, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, सीबीएसई आणि नवोदय विद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.
'परीक्षा पे चर्चा २०२५' हा कार्यक्रम अनेक प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पीआयबी, शिक्षण मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय इत्यादींच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केले जाणार आहे. त्याच वेळी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक दूरदर्शनसह अनेक वाहिन्यांवर 'परीक्षा पे चर्चा २०२५' पाहू शकतात. काही शाळांमध्ये 'परीक्षा पे चर्चा २०२५' चे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या