Narendra Modi Vadhdivas : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करत आहेत. भाजपचे सध्याचे सर्वोच्च नेते असलेल्या मोदींचा वाढदिवस पक्षातर्फे व कार्यकर्त्यांतर्फे मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सेवा पंधरवडा साजरा करण्यापासून ते विशेष सवलत देण्यासारखे उपक्रम कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहेत. मात्र, आजच्या दिवशी नरेंद्र मोदी नेमके कुठं असणार आहेत जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ते 'सुभद्रा योजने'सह महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते आज भुवनेश्वरमधील गडाकाना इथं २६ लाख पीएम आवास घरांचं उद्घाटन करणार आहेत. पोलीस आयुक्त संजीव पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी भुवनेश्वरच्या सैनिक शाळेजवळील गडकाना झोपडपट्टी परिसरात जातील.
झोपडपट्टीतील वास्तव्यादरम्यान ते पंतप्रधान आवास लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुभद्रा योजनेचा शुभारंभ करण्यासाठी ते जनता मैदानात रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ ते जनता मैदान आणि गडकाना हा मार्ग 'नो फ्लाइंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. सुभद्रा योजनेच्या शुभारंभाव्यतिरिक्त पंतप्रधान आज अनेक पायाभूत प्रकल्पांचं अनावरण करतील.
गडकाना गावात अल्पकाळ मुक्काम केल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास ते जनता मैदानात दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी २,८७१ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचं आणि १००० कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन करतील. दुपारी सव्वा एकच्या सुमारास पंतप्रधान मोदी ओडिशाहून दिल्लीला रवाना होतील.
ओडिशा सरकारनं महिलांसाठी आणलेली बहुचर्चित सुभद्रा योजना पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच आज १७ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या योजनेला भगवान जगन्नाथाची बहीण सुभद्रा यांचं नाव देण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी हे एक आश्वासन होतं. ते आज पूर्ण केलं जाणार आहे. या आर्थिक सहाय्य योजनेद्वारे दरवर्षी १ कोटी गरीब महिलांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन समान हप्त्यांमध्ये १० हजार रुपये दिले जाणार आहेत.