Narendra Modi spiritual tour : जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. त्यांनी देशभरात शेकडो सभा घेतल्या आहेत. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी दौऱ्यावर जाणार असून तिथं ध्यानधारणा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे ३० मे ते १ जून दरम्यान कन्याकुमारीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते रॉक मेमोरियलला अभिवादन करतील. त्यानंतर ते स्वामी विवेकानंद यांनी एकेकाळी ज्या ठिकाणी ध्यान धारणा केली होती, त्याच ध्यानमंडपात ध्यानधारणेला बसणार आहेत. हा दौरा अध्यात्मिक प्रवासासाठी असेल. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम होणार नाहीत.
अशा प्रकारच्या दौऱ्यावर जाण्याची नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच वेळ नाही. निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर मोदी हे अनेकदा अध्यात्मिक दौऱ्यावर जातात. २०१९ मध्ये ते केदारनाथला गेले होते, तर २०१४ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या प्रतापगडला गेले होते.
• कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांच्या जीवनात विशेष स्थान आहे. इथंच त्यांच्यात क्रांतिकारी बदल झाला. त्यांना भारतमातेच्या विशालतेचं दर्शन झालं. त्यांच्या जीवनावर याचा खोलवर परिणाम झाला. गौतम बुद्धांच्या जीवनात सारनाथचं जे स्थान आहे, तेच स्थान स्वामी विवेकानंदांच्या जीवनात रॉक मेमोरियलला आहे, असं अनेकांचं मत आहे.
• संपूर्ण देशात फिरून नंतर स्वामी विवेकानंद या ठिकाणी आले होते. इथं त्यांनी तीन दिवस ध्यान धारणा केली. हे स्थळ आता ध्यानमंडपम म्हणून ओळखलं जातं. इथंच विवेकानंदांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं.
• हे स्थान केवळ ऐतिहासिकच नाही तर हिंदू पौराणिक कथांमध्ये देखील त्याचं विशेष महत्त्व वर्णिलं आहे. देवी पार्वतीनं भगवान शंकराची वाट पाहत या ठिकाणी ध्यान केलं होतं, असं मानलं जातं.
• कन्याकुमारी हे भारताचं सर्वात दक्षिण टोक आहे. कन्याकुमारी हा देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला जोडणारा दुवा आहे.
• कन्याकुमारीमध्ये हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र एकत्र येतात. त्यामुळं या स्थळाला एक अद्वितीय भौगोलिक महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे. पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय यांनी आव्हान दिलं आहे. लोकसाभ निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.