pm modi to ministers : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पीएम मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना डीपफेकच्या मुद्द्यावर सावध राहण्याच्या सूचना केल्या. पंतप्रधानांनी मंत्र्यांना महत्वाच्या सूचना देखील केल्या. मोदी म्हणाले, आजकाल डीपफेकचे युग आहे, ज्याद्वारे आवाज देखील बदलता येतो. यामुळे सावध राहण्याची गरज आहे. आपल्या योजना सामान्य नगरिकांपर्यन्त पोहचवा असे देखील मोदी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा काही दिवसांनी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे पीएम मोदींनी भाजपला ३७० आणि एनडीएससाठी ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बैठकीदरम्यान, 'विकसित भारत: २०४७' साठी पुढील पाच वर्षांच्या विस्तृत कृती आराखड्यावरही चर्चा करण्यात आली.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना निवडणुकीदरम्यान लोकांना भेटताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांना कोणताही वाद टाळण्यास आणि डीपफेकपासून सावध राहण्यास सांगितले होते. सूत्राने सांगितले की, पीएम मोदींनी मंत्र्यांना सांगितले की, "कोणतेही विधान करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आजकाल डीपफेकचा जमाना आहे, ज्यामुळे आवाज देखील बदलला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा." सरकारच्या योजना सांगा आणि वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
त्याच वेळी, सरकारी सूत्रांनी सांगितले की, बैठकीत, मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने उचलल्या जाणाऱ्या १०० दिवसांच्या कार्यसूचीच्या तत्काळ अंमलबजावणीवर चर्चा झाली. विकसित भारताचा रोडमॅप हा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. सूत्रांनी सांगितले की यात सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग संघटना, नागरी समाज संघटना, वैज्ञानिक संस्था आणि तरुणांच्या सूचनांशी व्यापक सल्लामसलत करून सरकारच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा समावेश आहे.
या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, "विविध स्तरांवर २,७०० हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. २० लाखांहून अधिक तरुणांकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या." सूत्रांनी सांगितले की 'विकसित भारत' साठी रोडमॅप स्पष्टपणे व्यक्त केलेली राष्ट्रीय दृष्टी, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृतींसह सर्वसमावेशक ब्लू प्रिंट आहे. ते म्हणाले की आर्थिक वाढ, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), राहणीमान सुलभता, व्यवसाय करण्यात सुलभता, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. बैठकीत अनेक मंत्रालयांनी आपली मते मांडली. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीची ही बैठक बहुधा शेवटची बैठक असावी.
संबंधित बातम्या