Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पोलंड आणि युक्रेन या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोलंडची राजधानी वॉर्सा येथे पोहोचले आहेत. गेल्या ४५ वर्षात भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे. पीएम मोदींच्या आधी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९७९ मध्ये पोलंडला भेट दिली होती आणि असे करणारे ते शेवटचे पंतप्रधान होते. मोदी यांनी येथील भारतीय नागरिकांशी काल संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीतून भाषण करत कोल्हापूर आणि पोलंडच्या संबंधाबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा हा विडिओ देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला असून तो व्हायरल होतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौऱ्यावर असून बुधवारी केलेल्या एका भाषणाची सुरुवात त्यांनी थेट मराठीमधून केली. पोलंडमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी मराठीत भाषण देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळेस मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही आवर्जून उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.
मोदी यांचा पोलंडमध्ये मराठीत बोलतांनाचा व्हिडिओ शेअर करत फडवणीस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासित नागरिकांना महाराष्ट्राने दिलेला आश्रय आणि त्यातून महाराष्ट्राचा व भारताचा झळकलेला उदारमतवादी विचार, या साऱ्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. तसेच मैत्री आणि शौर्याचा वारसा! पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांची ऐतिहासिक ७० वर्षे असे देखील फडणवीस यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्याप्रती पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान असून मराठी संस्कृतीमध्ये मानव धर्माच्या आचरणाला सर्वाधिक प्राधान्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडच्या महिला आणि मुलांना आश्रय दिला होता. त्या ठिकाणी मोठा कॅम्प तयार करण्यात आला होता. ऐवढेच नाही तर पोलंडच्या महिलांना व मुलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या लोकांनी दिवस-रात्र एक करत काम केलं होतं, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यात वॉर्सा येथील कोल्हापूर मेमोरिअलला भेट दिली. या भेटीचे फोटो देखील त्यांनी एक्सवर शेयर केले आहे. यात त्यांनी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला पोलंडवासियांनी अर्पण केलेली श्रद्धांजली असल्याचं म्हटलं आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियाने पोलंडवर हल्ला केला होता. या युद्धात रशियाने स्थानिक पोलिश नागरिकांना पळवून लावले होते. लाखो पोलिश नागरिकानी देशातून पलायन केले होते. युद्धकाळात निर्वासितांची सोय करण्याची विनंती पोलंड सरकारनं जगातील अनेक देशांना केली होती. त्यावेळी शहाजी महाराज छत्रपती व जामनगरच्या बालाचडी यांनी कोल्हापूर आणि जामनगर येथे निर्वासितांच्या छावण्या उभारल्या होत्या.