मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Loksabha 2024: नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्यासाठी ‘या’ शहराची निवड का केली?

Loksabha 2024: नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्यासाठी ‘या’ शहराची निवड का केली?

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 24, 2024 02:12 PM IST

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होईल, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे.

Prime Minister Narendra Modi.
Prime Minister Narendra Modi. (PTI)

अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. अशात भाजप लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ कोणत्या शहरातून फोडणार, याबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ मध्ये तिसऱ्यांदा भाजपसाठी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे. वाराणसीचे खासदार असलेले मोदी यंदाच्या लोकसभेच्या प्रचाराची मोहिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातून सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ जानेवारी रोजी बुलंदशहर येथे मोदी जाहीर सभेला संबोधित करणार असल्याचं वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत नवनिर्मित मंदिरात रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील बुलंदशहात भाजप मोठा जाहीर प्रचार सभेचं आयोजन करणार आहे. लोकसभेत भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशात मोठं समर्थन प्राप्त होईल, असा भाजपच्या नेत्यांचा अंदाज आहे. या मेळाव्याला सुमारे पाच लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात येतोय. 

वाराणसी ऐवजी बुलंदशहराची निवड का?

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गृह मतदारसंघ असल्याने बुलंदशहर येथून प्रचाराला सुरुवात करण्याच्या पक्षाच्या निर्णयावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यात नऊ जागांची घसरण होऊन भाजपला ६२ आणि एनडीएचा घटक पक्ष असलेला अपना दल (सोनेलाल)  पक्षाचे दोन खासदार निवडून आले होते. दरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशातील एकूण १४ पैकी ८ जागा भाजपकडे असून, २०१९ मध्ये सहा मतदारसंघांत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलादरम्यान आघाडी झाली असून उत्तर प्रदेशात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी काँग्रेससोबत अधिक चर्चा करणार असल्याचे सपाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितले. यादव यांनी लखनौमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. जागावाटप करताना विजय हा महत्त्वाचा निकष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नव्या मतदार यादीत सपा समर्थकांची नावनोंदणी करण्याचे यादव यांनी यावेळी आवाहन केले. उत्तर प्रदेशात भाजप सरकारने काही सपा कार्यकर्त्यांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप यादव यांनी केला. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जागावाटपाची चर्चा झाली आहे.

WhatsApp channel