Death Threat To PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कर्नाटकातील यादगिरी येथील सूरपूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी दिली.
मोहम्मद रसूल कद्दरे नावाच्या व्यक्तीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओत त्याने काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे यादगिरी पोलिसांनी सांगितले.
आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (बी) अन्वये यादगिरीच्या सुरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. "आपल्या मोबाईल फोनवर सेल्फी व्हिडिओ बनवत रसूलने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले," पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कद्दरे यादगिरी जिल्ह्यातील रंगापेठचा रहिवासी आहे, तो हैदराबादमध्ये मजुरीचे काम करतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी हैदराबादसह विविध ठिकाणी आरोपींचा शोध सुरू केला आहे.