मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंतप्रधान म्हणून मोदींनाच पहिली पसंती; बंगालमध्ये ममतांनाही टाकलं मागे

पंतप्रधान म्हणून मोदींनाच पहिली पसंती; बंगालमध्ये ममतांनाही टाकलं मागे

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 02:44 PM IST

सर्व्हेमध्ये विचारण्यात आलं होतं की, पंतप्रधान पदासाठी सर्वात उपयुक्त उमेदवार कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

देशातील चार राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात झालेल्या निवडणुकीच्या एक वर्षानंतरही जनतेत मोदींसह इतर नेत्यांच्या प्रतिमेबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. आयएएनएस आणि सी व्होटरकडून आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ आणि पुद्दुचेरीत हा सर्व्हे केला होता. यामध्ये नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचा आवडता चेहरा म्हणून पसंती देण्यात आली आहे. तर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल याबाबतीत बरेच मागे आहेत. ज्या राज्यात सर्व्हे करण्यात आला होता तिथे २०२१ मध्ये निवडणुका झाल्या होत्या.

गेल्या वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या सर्व राज्यात पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाला पहिली पसंती देण्यात आली आहे. या पाच राज्यात जवळपास १२० लोकसभा मतदारसंघ आहेत. तामिळनाडु आणि केरळमध्ये मोदींनंतर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती देण्यात आलीय. सर्व्हेमध्ये विचारण्यात आलं होतं की, पंतप्रधान पदासाठी सर्वात उपयुक्त उमेदवार कोण?

आसाममध्ये उत्तर देणाऱ्या ४३ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना पसंती दिली. केजरीवाल ११.६२ टक्के, राहुल गांधी १०.९ टक्के लोकांनी पसंती दिली. केरळमध्ये राहुल गांधी यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. तिथल्या सर्व्हेमध्ये उत्तर देणाऱ्यांनी मोदींना २८ टक्के पसंती दर्शवली तर राहुल गांधी यांना २०.३८ टक्के तर केजरीवाल यांच्या नावाला ८.२८ टक्के पसंती दर्शवण्यात आली.

तामिळनाडुत काँग्रेस द्रमुकसोबत सत्तेत आहे. तिथल्या २९.५६ टक्के उत्तरदात्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाला पसंती दिली. इथे राहुल गांधी २४.६५ टक्क्यांसह दुसऱ्या तर ममता बॅनर्जी ५.२३ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी होते. पश्चिम बंगालमध्ये राज्यात ममता बॅनर्जी यांची सत्ता असली तरी मोदींना तब्बल ४२.३७ टक्के पसंती या सर्व्हेमध्ये देण्यात आली आहे. तर ममता बॅनर्जींना २६.०८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधी तिसऱ्या स्थानी आहेत.

WhatsApp channel