गुजरातमधील भरूच येथील एका स्क्रॅप व्यापाऱ्याने आपले अनधिकृत बांधकाम जमानदोस्त होण्यापासून वाचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. हे पाहून भरूच-अंकलेश्वर नागरी विकास प्राधिकरण (बीएयूडीए) च्या अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. व्यापारी मोहनलाल गुप्ता यांनी मागच्या वर्षी एक इमारत खरेदी केली होती. त्यावर आणखी एक मजल्याचे बांधकाम केले होते.
या बांधकामाविरोधात काही लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. व्यापाऱ्याने या आपले अवैध मजल्याचे बांधकाम वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर मंदिर बनवले. या मंदिरात प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती ठेवल्या. त्याचबरोबर त्या मंदिराबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पुतळे द्वारपालच्या रुपात बसवले.
मोहनलाल गुप्ता मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी या मंदिराचे उद्घाटन त्याच दिवशी केले ज्यादिवशी अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन झाले होते.
भरूच-अंकलेश्वर नागरी विकास प्राधिकरणाने मोहनलाल गुप्ता यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. मोहनलाल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ही मालमत्ता खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी इमारतीत अतिरिक्त मजला बांधला होता. मात्र, आता मोहनलाल गुप्ता यांनी या बेकायदा अतिरिक्त मजल्याच्या वरती श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे एक मंदिर बांधले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे पुतळे मंदिराबाहेर ठेवण्यात आले आहेत. मोदी आणि योगींना द्वारपाल म्हणून दाखवण्यात आले आहे.
गडखोल ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी घेतली होती. दुसरीकडे, अंकलेश्वरच्या गडखोल गावातील जनता नगर सोसायटीत राहणाऱ्या मनसुख रखसिया यांनी बेकायदा बांधकामाबाबत तक्रार केली. तक्रार आल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी इमारतीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. या प्रकारानंतर मोहनलाल गुप्ता यांनी गच्चीवर राम मंदिर बांधल्याचे आढळून आले. हे अवैध असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, काही लोक माझ्यावर जळतात त्यांना माझी प्रगती बघवत नाही म्हणून माझ्याविरोधात अतिक्रमणाची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी इमारतीचे स्ट्रक्चर पाडण्याची धमकी दिली आहे. त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली आहे. ते आमच्या सोसायटीपासून दूर एका रहिवाशी सोसायटीत राहतात.
दुसरीकडे ११ जुलै २०२३ को दाखल करण्यात आलेल्या राखसिया यांच्या तक्रारीनुसार गुप्ता यांनी या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. गुप्ता यांच्यासह दोन अन्य संपत्ती धारकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.