Brazil Plan Crashes: ब्राझीलमधील विन्हेडो येथे विमान कोसळल्याची घटना घडली. ग्लोबो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्होपास फ्लाइट २२८३ असे या विमानाचे नाव असून या विमानातून एकूण ६२ प्रवासी होते. या थरारक घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. साओ पाउलोच्या राज्य अग्निशमन दलाने विन्हेडो येथे विमान कोसळल्याच्या वृत्ताला सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. अपघातस्थळी सात कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.
फ्लाइट अवेअरने दिलेल्या माहितीनुसार, व्होपास फ्लाइट २२८३ हे ब्राझीलमधील कॅस्कॅव्हेल येथून ब्राझीलमधील साओ पाउलो येथे जात होते. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी कॅस्कॅवेलहून निघालेले हे विमान दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी साओ पाउलोयेथे उतरणार होते. फ्लाइटअवेअरने सांगितले की, हे विमान एटीआर एटीआर-७२ होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांच्या भितीजनक प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने असे म्हटले आहे की, ‘अशा घटनेत कोणत्याही व्यक्तीची बचावण्याची शक्यता शून्य आहे. पहिल्यांदाच विमानाचा असा अपघात बघितला.’ दुसऱ्याने असे म्हटले आहे की, ‘अशा अपघातातून कोणी वाचू शकत नाही.’ आणखी एका युजरने आपल्या कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, 'हे खूप विचित्र आहे. मला विमानातील लोकांबद्दल खूप वाईट वाटते.'