Viral News : अमेरिकेतील फ्लोरिडा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दोन डॉलरची टीप दिली नाही म्हणून एका पिझ्झा डिलिव्हर करणाऱ्या तरुणीने एका गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली आहे. महिलेने तिला दोन डॉलरची टिप देण्यास नकार दिल्याने ती संतापला आणि तिने तब्बल १४ वेळा चाकूने महिलेवर वार केले.
ब्रायना अल्वेलो (वय २२) असे आरोपई पिझ्झा डिलिव्हरी तरुणीचे नाव आहे. ब्रायनाने महिलेवर चाकूने १४ पेक्षा अधिक वेळेला वार केले. महिला ही गंभीर जखमी झाली असून या घटनेतून थोडक्यात बचावली आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
फ्लोरिडाच्या एका मोटेलमध्ये ही गुरुवारी घडली. ही महिला प्रियकर आणि तिच्या ५ वर्षांच्या मुलीसोबत वाढदिवस साजरा करत होती. ही महिला गरोदर होती. तिने पिझ्झा मागवला होता. ३३ डॉलरचा पिझ्झा मागवल्यानंतर महिलेने डिलिव्हरी करणाऱ्या महिलेला किरकोळ टीप दिली. ओसिओला काउंटी शेरिफच्या म्हणण्यानुसार, अल्वालोला महिलेने दिलेली किरलोळ टीप आवडली नाही. रात्री १० वाजता ती एका चेहरा बांधला असलेल्या तिच्या एका मित्रा सोबत मोटेलमध्ये शिरली. यावेळी दोघांनी गर्भवती महिलेवर चाकूने हल्ला केला. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अल्वेलोने पीडित गर्भवती महिलेवर १४ वार केले आणि तेथून पळ काढला.
या हल्ल्यादरम्यान पीडितेने आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तिच्या पाठीवरही वार केले. तिने मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला. पण अल्वेलोने तिचा फोन तोडला. हल्ल्यानंतर पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन तिला व तिच्या साथीदाराला अटक केली आहे. तिच्यावर खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्वेलो हिला जामीन नाकारण्यात आला आहे. सध्या तिला ओसिओला काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
पिझ्झा चेनच्या मालकाने या प्रकरणी माफी मागितली आहे. चौकशी सुरू असताना आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत, असे आश्वासन कंपनीने जनतेला दिले आहे. "ग्राहक आणि टीम मेंबर्सची सुरक्षा आणि कल्याण नेहमीच आमचे प्राधान्य आहे. "
संबंधित बातम्या