चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

Jan 30, 2025 06:38 AM IST

Pinaka Rocket System : भारतीय लष्कराकडे चार पिनाका रेजिमेंटअसून यातील काही रेजिमेंट चीनला लागून असलेल्या उत्तर सीमेवरील उंचावरील भागात तैनात करण्यात आले आहेत, तर उर्वरित सहा रेजिमेंट वाढवण्याची तयारी लष्कराने सुरू केली आहे.

चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी
चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी (PTI)

Pinaka Rocket System : भारतीय बनावटीच्या पिनाका मल्टी लाँच आर्टिलरी रॉकेट सिस्टीम खरेदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) दोन मोठ्या करारांना बुधवारी मंजुरी दिली. तब्बल १०,२०० कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी केला जाणार आहे. यात पिनाका रॉकेट प्रणालीचा समावेश आले. पिनाका रॉकेट यंत्रणेची मारक क्षमता वाढवण्यात आली असून ही यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक घातक झाली आहे.

पहिला करार हा ५,७०० कोटी रुपयांचा आहे. या कराराअंतर्गत हाय-एक्सप्लोसिव्ह प्री-फ्रैगमेंटेड रॉकेट एम्युनेशनचा समावेश आहे. तर दुसरा करार हा ४,५०० कोटी रुपयांचा आहे, ज्यात एरिया डिनायल अ‍ॅम्युनिशनचाही समावेश आहे. लष्करासाठी आवश्यक असलेल्या १० पिनाका रेजिमेंटसाठी हा करार करण्यात आला आहे.

या हाय-एक्सप्लोसिव्ह प्री-फ्रैगमेंटेड रॉकेट एम्युनेशनची मारक क्षमता ४५ किमीपर्यंत आहे, तर एरिया डिनायल दारुगोळा हा ३७ किमी अंतरापर्यंत प्रक्षेपित केला जाऊ शकतो. एरिया डिनायल दारुगोळ्यामध्ये रणगाडाविरोधी आणि एंटी-पर्सनल माइनलेट्सचा देखील समावेश आहे.

नागपूर येथील खासगी क्षेत्रातील कंपनी सोलर ग्रुप आणि सरकारी अ‍ॅम्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून ६०:४० या प्रमाणात या दोन प्रकारच्या दारुगोळ्याची निर्मिती केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत या दोन्ही कंपन्यांशी करार करण्यात येणार आहेत.

भारतीय लष्करात पिनाकाच्या १० रेजिमेंट उभारण्याची तयारी

सध्या भारतीय लष्कराकडे चार पिनाका रेजिमेंट आहेत. यातील काही रेजिमेंट या चीनला लागून असलेल्या उत्तर सीमेवरील उंचावरील भागात तैनात करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित सहा रेजिमेंटची निर्मिती करून त्या लष्करात दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डीआरडीओने पिनाका रॉकेट यंत्रणेसाठी विविध प्रकारचा दारुगोळा तयार केला आहे. ज्यात ४५ किमी रेंज आणि ७५ किमी गाइडेड रॉकेट प्रणालीचा देखील समावेश आहे. याची रेंज व मारक क्षमता आणखी वाढवण्यात आली आहे. पिनाका रॉकेट प्रणालीची मारक क्षमता ही १२० किमी आणि नंतर ३०० किमी पर्यंत वाढवण्याची योजना आहे.

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, "लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे भारतीय शस्त्र मिळताच इतर देशांकडून खरेदी करणाऱ्या लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा विचार लष्कर थांबवू शकतं आणि पिनाकावरच लक्ष केंद्रित करू शकतं." या करारामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असून पिनाका प्रणाली अधिक घातक आणि परिणामकारक होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर