MP Dindori Accident News : डोहाळे जेवणाचा (Baby Shower) कार्यक्रमाला गेलेल्या लोकांना घेऊन परतणाऱ्या एका पिकअप व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील दिंडोरी इथं हा अपघात झाला.
अपघातग्रस्त व्हॅन शाहपुरा पोलीस ठाणे आणि बिचिया पोलीस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटातून परतत होती. घाटात असताना पिकअप व्हॅन चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि व्हॅन उलटली. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी शाहपुरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातात मृत्यू झालेले व जखमी झालेले सर्व लोक आमादेवी गावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये ८ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मृतांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना मोहन यादव यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.