पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडु दौऱ्यावर आहे. १८ मार्च रोजी त्यांचा कोयंबतूरमध्ये एक रोड शो होणार होता. मात्र त्याला राज्य सरकारने आधी परवानगी नाकारली होती. सुरक्षेच्या कारणावरून राज्य सरकारने मोदींच्या रोड शो ला परवानगी नाकारली होती. मात्र आता मद्रास उच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींच्या कोयंबतूरमधील रोड शो साठी परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून सोमवारी कोयंबतूर शहर पोलिसांना एक अर्ज देत १८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन किलोमीटरच्या रोड शोसाठी परवानगी मागितली होती. मात्र कोयंबतूर पोलीस प्रशासनाने विविध कारणे सांगत या रोड शोला परवानगी नाकारली होती.
भाजपकडून ३.६ किलोमीटर लांब रोड शो पहिल्यापासून नियोजित होता. भाजपची इच्छा होती की, हा रोड शो कोयंबतूरमधून सुरू व्हावा. मात्र स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरून या रोड शो ला परवानगी दिली नाही. प्रशासनाने म्हटले की, या रोड शो मुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे याला मंजुरी देता येणार नाही. मात्र याविरोधात भाजपने मद्रास हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला व कोर्टामार्फत या रोड शोला परवानगी मिळवली.
भाजपकडून आयोजित मोदींचा हा रोड शो कोईंबतूर येथून सुरू होऊन आरएसपुरम येथे संपणार होता. मात्र आरएस पुरम शहरात १९९८ साली बॉम्बस्फोट झाले होते. त्याचबरोबर कोयंबतूर शहरही संवेदनशील असल्याने येथे कोणत्याच राजकीय पक्षाला रोड शो करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र भाजप येथे रोड शो करण्यावर ठाम असून आता न्यायालयाच्या परवानगीनंतर येथे मोदींचा रोड शो होणार आहे.