Maha Kumbh Stampede : मौनी अमावास्येला स्नानासाठी जमलेल्या गर्दीत बुधवारी महाकुंभादरम्यान, बुधवारी रात्री १ ते २ च्या दरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर काही नागरिक जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच जखमींवर उपचार सुरू आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी झाली या बाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.
मौनी अमावास्येला स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मौनी अमावस्येला होणाऱ्यामनाच्या अमृतस्नानासाठी आम्ही येथे आलो होतो. हा महाकुंभाचा प्रमुख विधी असून येथे अंदाजे १० कोटी भाविक उपस्थित असतील. यावर्षी यंदा १४४ वर्षांनंतर होत असलेल्या दुर्मिळ 'त्रिवेणी योगा'मुळे लाखो भाविक सकाळी सांगमावर येण्यासाठी निघाले होते. गर्दी वाढत गेली. भाविकांना स्नान कुठे करायचे याची माहिती नव्हती. अचानक ही गर्दी अनियंत्रित झाली आणि नागरिक एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. यातच बरेच जण खाली पडले. त्यांच्यावर आणखी काही नागरिक पडले. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. यात काही जण जखमी झाले होते. पोलिसांनी तातडीने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, मोठी संख्या असल्याने त्यांना ते जमले नाही. यामुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
प्रत्यक्षदर्शी विवेक मिश्रा म्हणाले की, संगमावर मोठा गोंधळ होता. भाविकांना कुठे जायचे हे समजत नसल्याने व या ठिकाणी लावण्यात आलेल्या बेरिकेट्समुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यातच गर्दी अनियंत्रित झाली आणि जेव्हा लोकांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळात इतरांना मदत करण्याचा प्रयत्नात मी देखील जखमी झालो असे मिश्रा म्हणाले.
दरम्यान, काही जणांनी नाव न छापण्याच्या अटीवर रुग्णालयात किमान १५ मृतदेह आणण्यात आले अशी माहिती दिली. मात्र, महाकुंभातील मृतांच्या संख्या किती या बाबत अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक जमल्यावर ही घटना घडली. वाढलेल्या या गर्दीला आंघोळ केल्यानंतर कुठे जायचे हेच कळत नव्हते. अनेक जण डोक्यावर अवजड सामान घेऊन जात होते. तर खाली असंख्य लोखंडी डस्टबिन होते जे यात्रेकरूंना दिसत नव्हते. यामुळे काही जणांचा तोल गेला आणि ते एकमेकांच्या अंगावर पडले. त्यांचे सामान सर्वत्र विखुरले गेले. माझे पाय एका डस्टबिनमध्ये अडकल्याने, मीही पडलो. यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली. मी कसाबसा उठलो आणि जमिनीवर पडलेल्या माझ्या आई-वडिलांना आणि आणखी एका महिलेला मदत केली. तेवढ्यात गर्दीतील तरुणांनी इतरांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. मी जे पाहिलं ते मी पूर्णपणे सांगू शकत नाही," असं विवेक मिश्रा यांनी सांगितलं.
फतेहपूर येथील रहिवासी राम सिंह यांनी सांगितले की, बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने आणि जमाव वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होता, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. आमच्या ग्रुपचे चौघे आधीच पुढे गेले होते आणि आम्ही त्यांना नंदनी द्वारला थांबण्यास सांगितले होते. आम्ही चौघे मागे अडकलो. बरेच लोक आमच्यासमोर पडत होते. रस्ता जाम झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली
आणखी एक प्रत्यक्षदर्शी बलिया येथील बलजीत सिंग यांनी सांगितले की, अचानक एवढी मोठी गर्दी झाली की सर्वजण चिरडले गेले. आम्ही १४ जण होतो आणि कोणी कुठे गेलं हेही सांगता येत नव्हतं. आम्ही आंघोळीला जात होतो आणि तिथून लोक परत येत होते. एवढी गर्दी कशी झाली हे आम्हाला कळलंच नाही आणि मग लोक एकमेकांच्या अंगावर पडू लागले.
संबंधित बातम्या