Navratri 2024: नवरात्रोत्सव जवळ आला असून देशातील विविध ठिकाणी दुर्गापूजेची तयारीला सुरुवात झाली. तसेच लहानांपासून तर थोरापर्यंत प्रत्येकजण गरबा खेळण्यासाठी उस्तुक झाले आहेत. मात्र, यापूर्वी मध्य प्रदेश भाजपचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी गरब्यात प्रवेश करण्यापूर्वी लोकांना गोमूत्र प्यायल्यानंतरच गरब्यात प्रवेश देण्यात यावा, असे वक्तव्य केले आहे. गरब्यात हिंदूसह इतर समाजातील लोकही सहभागी होतात आणि गर्दीचा फायदा घेऊन मुलींची छेड काढतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चिंटू वर्मा यांनी गरबा नियोजकांना असा सल्ला दिला आहे. मात्र, भाजप नेत्याचे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी एका गरबा मंडपात घुसून गोंधळ घालणाऱ्या मुस्लीम तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही गरबा कार्यक्रमाच्या आयोजकांना मंडपात प्रवेश करण्यापूर्वी लोकांना गोमूत्र प्यायला द्यावे, अशी विनंती केली आहे, अशी माहिती चिंटू वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आधार कार्ड एडिट करता येते. परंतु, एखादी हिंदू व्यक्ती असेल तर तो गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र पिण्यास नकार देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
चिंटू वर्मा म्हणाले की,'गरब्यात प्रवेश करताना लोकांना गोमूत्र पिण्यास द्यायला पाहिजे. हिंदू धर्माच्या लोकांना गोमूत्र पिण्यास हरकत नाही. पण ते इतर धर्माचे लोक असतील तर, गोमूत्र कधीच पिणार नाहीत. आधारकार्ड एडीट करता येते. लोक चुकीचे आधारकार्ड दाखवून गरब्यात प्रवेश करू शकतात. यामुळेच गोमूत्र हा उत्तम पर्याय आहे.'
गरब्यात सहभागी होण्यासाठी इतर धर्माचे बरेच लोक भगवा टीळा लावून येतात. अशा परिस्थितीत त्यांची ओळख पटवणे शक्य नसते. त्यामुळे गोमूत्र हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे इतर धर्माच्या लोकांना गरब्यात प्रवेश करण्यापासून रोखता येईल. काल छत्तीसगडमध्येही अशीच मागणी करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेसह अनेक संघटनांनी गरब्याला येणाऱ्या लोकांना गंगाजल उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.
देशात महाराष्ट्रासह हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होता आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नको त्या विषयाचे राजकारण करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी केला. गोमूत्राची मागणी करणे ही भाजपची नवी चाल आहे. भाजप नेत्यांनी गरब्यात प्रवेश करण्यापूर्वी गोमूत्र पिऊन त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.