Mehbooba Mufti Car Accident News : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती गुरुवारी एका कार अपघातातून थोडक्यात बचावल्या. या अपघातात त्याच्या कारचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात हा अपघात झाला. पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी मुफ्ती खानबल इथं जात असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. सुदैवानं मुफ्ती यांना इजा झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मेहबुबा यांची मुलगी इल्तिजा हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अपघाताची माहिती दिली. 'मेहबूबा मुफ्ती यांच्या कारला आज अनंतनागच्या वाटेवर भीषण अपघात झाला. ईश्वर कृपेनं मुफ्ती आणि त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, असं इल्तिजानं म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकारनं अपघाताची चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे. मेहबुबा यांच्या सुरक्षेत काही त्रुटी असतील तर त्या ताबडतोब दूर करणं आवश्यक आहे,’ असं ओमर अब्दुल्ल यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.