
Climate Change: जगातील बडे उद्योगपती, श्रीमंत व्यक्तींकडून संपत्ती दान केल्याचं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एका दिग्गज उद्योगपतीने आपली सर्व संपत्ती दान केली असून त्याची चर्चा सध्या आहे. ५० वर्षे जुनी कंपनी दान केली असून त्याने म्हटलं की, पृथ्वी धोक्यात आहे तिला वाचवा. उद्योजकाने कंपनीचं सारं उत्पन्न वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी दान केलं आहे.
अमेरिकेतील कापडाची रिटेलर कंपनी असलेल्या पेटागोनियाचे संस्थापक यवोन चोनार्ड यांनी कंपनी दान केली आहे. त्यांनी म्हटलं की, हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी जवळपास ५० वर्षांपूर्वी सुरू केलेला माझा व्यवसाय दान करण्याचा निर्णय घेतला आहे. चोनार्ड यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांनीसुद्धा त्यांच्या या कंपनीतली सर्व संपत्ती दान करण्याची घोषणा केलीय.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पेटागोनिया कंपनीची किंमत जवळपास ३ बिलियन डॉलर इतकी आहे. कंपनीचे सर्व उत्पन्न हे हवामान बदलाच्या लढ्यासाठी, जैवविविधतेच्या रक्षणासाठी आणि जंगले वाचवण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना दिले जाईल.
आपल्या या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आता फक्त पृथ्वी हीच आमची एकमेव भागधारक आहे. याबाबतचे पत्र पेटागोनियाच्या अधिकृत संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आलं आहे. धोक्यात असलेल्या या ग्रहाला वाचवण्यासाठी आपण जे करू शकतो ते करायला हवं. हे केवळ आपणच करू शकतो असंही त्यांनी म्हटलंय.
पर्यावरणाचं हे संकट दूर करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहे पण हे पुरेसं नाहीय. आपल्याला या संकटात लढण्यासाठी अधिक पैसे लागतील आणि त्यासाठी काही मार्ग काढण्याची गरज आहे. आमच्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे पेटागोनिया विकण्याचा आणि दान करण्याचा असं चोनार्ड यांनी म्हटलं.. कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं की, सध्याचा व्यवसाय हा १०० मिलियन डॉलर इतका आहे. प्रत्येक वर्षी आता ही पूर्ण रक्कम दान केली जाईल.
संबंधित बातम्या
