पुणे आणि शिर्डीसह देशभरात १३ राज्यात ३७ शहरांमध्ये गृह प्रकल्पांची निर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वनाथ डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव जैन यांना दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. संजीव जैन यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु जैन यांनी पोलिसांना सहकार्य न करता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघून गेले. पोलिसांनी जैन यांचा ६० किलोमीटरचा पाठलाग केल्यानंतर अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये रजत बब्बर नावाच्या एका ग्राहकाने संजीव जैन यांच्याविरोधात ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. ग्राहक आयोगाने जैन यांना उपस्थित राहण्यासाठी अनेक वॉरंट जारी केले होते. जैन यांच्याविरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून जारी करण्यात आलेले चार अजामीनपात्र आणि एक जामीनपात्र वॉरंट दिल्लीतील शहादरा पोलिस ठाण्यात प्रलंबित होते. नुकतेच १८ जुलै २०२४ रोजी आणखी एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु संजीव जैन आयोगासमोर हजर झाले नाहीत.
'राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर हजर राहण्यास वारंवार असमर्थ ठरल्याबद्दल पार्श्वनाथ डेव्हलपर्सचे सीईओ यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटनंतर शाहदरा येथील स्पेशल टास्क फोर्सच्या जवानांनी जैन यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली असल्याची माहिती शाहदराचे पोलीस उपायुक्त सुरेंद्र चौधरी यांनी दिली.
संजीव जैन हे पार्श्वनाथ डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गेले ३२ वर्षांपासून कार्यरत आहेत. पार्श्वनाथ डेव्हलपर्स या इमारत बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या उपकंपनीचे ते सध्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जैन हे दिल्लीजवळच्या गुरुग्राम येथील रहिवासी असून डीएलएफ फेज २ मध्ये ते राहतात. पार्श्वनाथ डेव्हलपर्स ही कंपनी १९८४ मध्ये स्थापन झाली असून देशभरातील १३ राज्यातील ३७ शहरांमध्ये इमारत निर्मितीचे काम केले आहे.
संजीव जैन यांचे शालेय शिक्षण उत्तर प्रदेशातील खेकरा येथे झाले. येथील जैन खेकरा इंटर कॉलेजमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठातून जैन यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. अटकेनंतर संजीव जैन यांना रविवारी आयोगासमोर हजर करण्यात आले.