Parliament Budget Session 2025 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ३१ जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषणाने होईल आणि त्यानंतर आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल.
सुट्टीनंतर अधिवेशनाचा दुसरा भाग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संभाव्य कालावधी १० मार्च ते ४ एप्रिल असा आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या भागात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होते आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांच्या उत्तराने संपते.
१८ व्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४ पर्यंत चालले होते. २६ दिवस चाललेल्या या अधिवेशनात लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत सादर झालेल्या ५ विधेयकांपैकी ४ विधेयके मंजूर केली. तर राज्यसभेने ३ विधेयके मंजूर केली.
एकंदरीत, हिवाळी अधिवेशन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात गोंधळाने भरलेले होते आणि सभागृहाचे कामकाज तहकूब होत राहिले. विरोधकांनी उपराष्ट्रपती धनकड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. तसेच अमित शहा यांच्या डॉ. आंबेडकरांवरील टिप्पणीने देशभरात बराच गदारोळ माजला होता.
संबंधित बातम्या