Rahul gandhi on Ambani Adani : ‘अदानी आणि अंबानी या दोघांचंही देशातील उद्योगविश्वावर वर्चस्व आहे. त्यांच्याबद्दल चर्चा होणं साहजिक आहे. तरीही त्यांची नावं घ्यायची नसतील असं तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांना A1, A2 म्हणू शकतो का?,’ असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केला.
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. ‘देशाच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी काहीही नाही. हे सरकार फक्त अंबानी आणि अदानी यांची काळजी घेतं, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेतला. ‘जे सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही भाष्य करू शकत नाही. त्यावर, मी या लोकांना ३, ४ बोलू की A1 आणि A2 बोलू? असा प्रतिप्रश्न राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना केला. 'अंबानी आणि अदानी हे देशातील मोठे उद्योजक आहेत. उद्योगविश्वावर त्यांची पकड आहे. त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला गप्प करू शकत नाही. त्यांची नावं आम्ही घेऊ नये अशी तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यासाठी पर्यायी व्यवस्था करू शकता, परंतु आम्ही शांत राहणार नाही, असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.
'देशातील दलित आणि मागासवर्गीयांना कुठंही स्थान मिळत नाही. त्यांना कॉर्पोरेट इंडिया, नोकरशाही आणि सरकारमध्ये स्थान दिलं जात नाही. बजेटच्या हलवा समारंभाचं चित्रही त्यांनी दाखवलं. या चित्रात एकही दलित, आदिवासी आणि ओबीसी अधिकारी दिसत नाही. बजेटची खीर वाटली जात आहे, पण देशाला मिळत नाही, असं ते म्हणाले. 'जात जनगणनेचा मुद्दा अर्थसंकल्पात मांडला जावा, अशी माझी अपेक्षा होती. संपूर्ण देशाची ती मागणी आहे. गरीब सामान्य जातीतील लोकांना आणि अल्पसंख्याकांचीही ती मागणी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
भारतीयांनी स्वप्न पाहू नयेत अशी या लोकांची मानसिकता आहे. देशातील २ ते ३ टक्के लोक हलव्याचं वाटप करतात आणि तेवढ्याच लोकांना तो मिळतो, असा टोला राहुल यांनी हाणला. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन हसताना दिसल्या. तेव्हा, ही हसण्याची गोष्ट नाही, असं राहुल यांनी सीतारामन यांना सुनावलं. या लोकांना वाटते की देशातील लोक अभिमन्यू आहेत, पण ते अर्जुन आहेत, असं राहुल गांधी यांनी सुनावलं.
'शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांना आत जाऊ दिलं जाणार नाही असं मला सांगण्यात आलं. ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचल्यावर मी गेलो आणि मग त्यांच्यासाठी दरवाजे उघडले गेले, असं राहुल गांधी म्हणाले. या संदर्भात ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहाच्या आवारात सदस्याशिवाय कोणीही बोलू शकत नाही, अशी व्यवस्था आहे. पण तुम्हाला भेटायला आलेल्या लोकांनी तुमच्या उपस्थितीत निवेदनं दिली. हे चुकीचं आहे. त्यावर राहुल गांधी यांनी चूक मान्य केली. मला तांत्रिक गोष्टींची माहिती नाही, असं ते म्हणाले.