Rahul Gandhi for Vinesh Phogat : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाविरोधात दिल्लीच्या रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करणारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक गाजवत आहे. उपांत्य फेरीत ऐतिहासिक विजय मिळवत आता तिनं सुवर्ण पदक पटकावण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. या निमित्तानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनेशचं कौतुक करताना मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
विनेश फोगाट हिनं उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा ५-० असा पराभव केला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली. उपांत्यपूर्व फेरीत तिनं टोकियो २०२० चॅम्पियन जपानच्या युई सुसाकीचाही पराभव केला. विशेष म्हणजे जपानच्या कुस्तीपटूला ८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागलं.
राहुल गांधी यांनी आतापर्यंतच्या विजयाबद्दल विनेशचं अभिनंदन करणारी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. कुस्तीपटूसह संपूर्ण देश भावूक झाला आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष व भाजपचे बाहुबली नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'चॅम्पियन्सची हीच ओळख असते, ते आपलं उत्तर मैदानात देतात, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
विनेश फोगाट आणि तिच्या सहकाऱ्यांच्या संघर्षाची दखल घेण्यास नकार देणाऱ्या, त्यांचा हेतू आणि क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे. एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतर विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेशला रक्ताचे अश्रू ढाळायला लावणारं दु:ख दिलं, ती संपूर्ण सत्ताव्यवस्था भारताच्या या साहसी मुलीसमोर कोसळून पडली आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे. पॅरीसमधील तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय, अशा शब्दांत राहुल यांनी विनेशचं अभिनंदन केलं आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही विनेशचं अभिनंदन करत अंतिम फेरीतील विजयासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गेल्या वर्षी महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचं विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, रवी दहिया याच्यासह अनेक कुस्तीपटूंचं म्हणणं होतं. त्या विरोधात न्याय मागण्यासाठी या सर्वांनी जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं.
हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी केला होता. या घटनेनंतर कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगेत फेकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेरच्या क्षणी शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्यांना रोखलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळं देशभरातून केंद्रातील मोदी सरकावर टीकेची झोड उठली होती. आता विनेशनं देशाला पदक मिळवून दिल्यानंतर पुन्हा त्या संघर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.