Swara Bhaskar on Vinesh Phogat disqualified: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाईल गटाच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे. सुवर्णपदकासाठी फोगाटची लढत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँडशी होणार होती. मात्र,आज सकाळी फोगाट हिचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असल्यााने तिला अपात्र ठरवण्यात आले. यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
फोगाटचे वजन ५० किलो वजनी गटापेक्षा जास्त आहे. आज सकाळी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. नियम तशी परवानगी देत नाहीत आणि तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या म्हणण्यानुसार, रात्रभर संघाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही फोगाट कुस्ती प्रकारातील अनिवार्य वजनाच्या निकषासाठी पात्र ठरू शकली नाही. आयओएच्या एका पोस्टमध्ये एएनआयने म्हटले आहे की, आज सकाळी फोगटचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे. यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ट्विटरच्या माध्यमातून 'या १०० ग्रॅम वजनाच्या कथेवर कोण विश्वास ठेवेल?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.
'विनेश, तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या धक्क्याने दुखावलो आहे. मी किती निराश झालोय, हे शब्दांत व्यक्त करता येऊ शकत नाही.पण मला माहीत आहे की, तू तुझ्या शैलीत पुनरागमन करशील. आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे हा तुझा स्वभाव आहे. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.'
पंतप्रधानांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी ही चर्चा केली आणि विनेशच्या अपात्रतेवर भारताकडे असलेल्या पर्यायांची प्रत्यक्ष माहिती घेतली. मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले. विनेशला मदत झाल्यास तिच्या अपात्रतेबाबत तीव्र निषेध नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधानांनी पीटी उषा यांना केले.
६ ऑगस्ट रोजी फोगाटने ऑलिम्पिक 2024 मधील महिलांच्या फ्रीस्टाईल ५० किलो वजनी गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात मोठा उलटफेर केला. त्यानंतर भारतीय कुस्तीपटूने युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आणि ऑलिम्पिक पदकाच्या जवळ पोहोचली.