Israel-Hamas ceasefire Deal : इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. या नुसार इस्रायलने आज ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. या कैद्यांचे गाझामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पांढऱ्या व्होल्वो बसमधून इस्रायलने रेडक्रॉसकडे सोपवलेल्या कैद्यांनी त्यांचे पथक गाझामध्ये दाखल होताच जल्लोष केला. काही जण बसच्या छतावर चढले आणि विजय साजरा करू लागले. नागरिकांच्या हातात हमास आणि हिजबुल्लाहचे झेंडेही होते. इस्रायलच्या कैदेतून सुटलेल्या ९० जणांना घेऊन बसरामलहापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतुनिया शहरात पोहोचल्यावर जल्लोष झाला. हजारो पॅलेस्टिनींनी बसेसना घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. हमासने तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली.
शस्त्रसंधीनंतर हमास आणि इस्रायलयांच्यात झालेला हा पहिलाच करार होता. आता २५ तारखेला दुसऱ्यांदा दोन्ही बाजूच्या कैद्यांची सुटका केली जाणार आहे. या करारानुसार इस्रायलच्या बंधकाच्या बदल्यात बेंजामिन नेतन्याहू सरकार आपल्या तुरुंगात कैद असलेल्या ३० जणांची सुटका करणार आहे. आज इस्रायलने सुटका केलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुले आहेत. या लोकांवर इस्रायलच्या सुरक्षेचा भंग केल्याचा आरोप आहे. जसे की इस्रायली शासनाच्या कार्यालयांवर दगडफेक करणे, सुरक्षा दलांना लक्ष्य करणे इत्यादी. याशिवाय काही जणांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हेही दाखल करण्यात आले होते. हमासने कैद्यांची झालेली सुटका आणि शस्त्रसंधी आपला विजय झाल्याच म्हटलं आहे.
दरम्यान, गाझामधील बेघर झालेले नागरिक पुन्हा आपल्या घरी पोहचू लागले आहे. अनेकणाचे घर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात नष्ट झाले आहे. असे असतांना देखील त्यांच्या चेहऱ्यावर मायभूमीत परतण्याचा आनंद दिसत आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या आशेने लोक गाझामध्ये परतत आहेत. त्यांना त्यांची घरे पुन्हा उभे राहील असा विश्वास आहे. गेल्या दीड वर्षांपासून येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे एकट्या गाझामध्ये ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. पॅलेस्टाईनच्या जनतेलाही आता मानवतावादी मदत मिळत आहे.
शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर मानवतावादी मदतीने भरलेल्या ६३० ट्रक गाझामध्ये दाखल झाले आहे. खरं तर, गाझामध्ये एक मोठा भाग आहे जिथे लोक स्वच्छ पाणी, अन्न आणि औषधांसाठी अजूनही तळमळत आहेत. अशा परिस्थितीत हे मानवतावादी मदतीचे साहित्य त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. इस्रायलने या पूर्वी ही मदत रोखून धरली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या कारारात मानवतावादी मदत पोहोचवणारे ट्रक थांबवले जाणार नाहीत, असेही ठरविण्यात आले होते. इस्रायल आणि हमास यांच्यात १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता थांबल्याने मध्यपूर्वेतील अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दीड वर्षात इराण, तुर्कस्तान, अमेरिकेसह अनेक देश या युद्धात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतले होते.
संबंधित बातम्या