Imran khan arrested : हायकोर्टाच्या बाहेरून इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी चक्क ओढत नेले, पाहा Video
Imran khan arrested : इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ पीटीआयने शेअर केला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांना आज अटक करण्यात आली. इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ पीटीआयने शेअर केला असून यामध्ये पाकिस्तानी रेंजर्स इम्रान खान यांना खेचत नेऊन एका व्हॅनमध्ये बसवत असल्याचे दिसते.
ट्रेंडिंग न्यूज
इम्रान खान यांना खूप टॉर्चर करून अशाप्रकारे अटक म्हणजे त्यांचं अपहरण असल्याचा आरोप त्यांचा पक्ष पीटीआयने केला आहे. तसेच इम्रान खान यांची हत्या केली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पीटीआयने याबाबतचं ट्वीट केलं आहे. इम्रान खान यांना अटक करताना पाकिस्तानी रेंजर्सकडून धक्काबुक्की करण्यात आली,ज्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोपही पीटीआयने केला आहे.
इम्रान खान यांचा अटक करताच हायकोर्टाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे. कोर्टावर रेंजर्सनी कब्जा केला आहे,वकिलांना यातना दिल्या जात आहेत, तसंच इम्रान खान यांच्या कारला घेरण्यात आलं, असा आरोप पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या वकीलालाही मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओही पीटीआयने शेअर केला आहे. ७० वर्षांच्या इम्रान खान यांना टॉर्चर करण्यात येत आहे, त्यांना मारहाण झाल्याचंही त्यांच्या पक्षानं म्हटलं आहे.
इस्लामाबाद न्यायालयाबाहेर इम्रान खान यांच्यावरअटकेची कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांनाअटक करण्यात आली असून याकारवाईनंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.