ISI agent arrested from Meerut : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने मेरठमधून आयएसआय एजंटला अटक केली आहे. हा पाकिस्तानी एजेंट मॉस्को येथील भारतीय दूतावासात काम करत होता. सत्येंद्र सिवाल असे या एजेंटचे नाव असून तो हापूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. सिवालने पाकिस्तानला भारतीय लष्कराची अनेक गोपनीय माहिती दिल्याचे उघड झाले आहे. तो भारतीय दूतावासात आयबीएसए या पदावर कार्यरत आहे.
यूपी एटीएसने या बाबत प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेश एटीएसला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. आरोपी २०२१ पासून रशियाची राजधानी मॉस्को येथील भारतीय दूतावासात भारत आधारित सुरक्षा सहाय्यक म्हणून तैनात आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक आधार कार्ड, एक पॅन कार्ड आणि एक ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.
एटीएसला अशी गुप्त माहिती मिळाली होती की पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हँडलर परराष्ट्र मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून भारताची काही महत्त्वाची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुप्त माहितीवर उत्तर प्रदेश एटीएसने काम सुरू केले. तपासादरम्यान सत्येंद्र सिवालची माहिती मिळाली. सिवाल यांनी यापूर्वी मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्रालयात मल्टी टास्किंग कर्मचारी म्हणून काम केले होते.
तपासादरम्यान, यूपी एटीएसला कळले की सत्येंद्र सिवाल भारताच्या संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि लष्करी संघटनांच्या धोरणात्मक क्रियाकलापांबद्दल महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहिती ISI हँडलर्सला देत होता. एटीएसच्या मेरठ युनिटने त्याला त्यांच्या शाखेत बोलावून त्याची कसून चौकशी केली. यावेळी एटीएस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकला नाही आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे खबळल उडाली आहे. आणखी किती पाकिस्तानी गुप्तचर भरतातीय दूतावासात आहेत याचा कसून तपास केला जात आहे. सिवालने आत पर्यंत कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली आहे, याचा तपास देखील एटीएस करत आहेत.