पाकिस्तानचे १४ राष्ट्रपती म्हणून आसिफ अली झरदारी यांची निवड झाली आहे. त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाचा पदभार संभाळला आहे. अनेक वादात अडकूनही झरदारी राजकारणातील अनुभवी नेते आहे. पाकिस्तानच्या राजकारणात त्यांचे मोठे वजन असल्याचे सांगितले जाते.
आज झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आसिफ अली झरदारी यांनी इम्रान खान यांच्या उमेदवाराचा २३० मतांनी पराभव केला. झरदारी यांना ४११ मते मिळाली, तर इम्रान खान यांच्या उमेदवाराला केवळ ११८ मते मिळाली. नवाज यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावलचा पक्ष पीपीपी यांनी मिळून आसिफ अली झरदारी यांना उमेदवारी दिली. २००८ मध्येही ते राष्ट्रपती बनले होते.
इम्रान समर्थक SIC पक्षाने महमूद खान अचकझाई यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान सुरू असताना पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या काही सदस्यांनी इम्रान खान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. मात्र, झरदारी राष्ट्रपती होणार हे आधीच निश्चित मानले जात होते.
आसिफ अली झरदारी यांना पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे नेते शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सहा पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती. ४११ मते मिळवून झरदारी यांनी मोठा विजय मिळवला आहे.
यापूर्वी २००८ मध्ये पहिल्यांदा आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले होते. २०१३ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर होते. आता ११ वर्षानंतर त्यांचा राजकीय वनवास संपला आहे. नवाज यांच्या पक्षाकडून मोठी विजय मिळवत ते राष्ट्रपती बनले आहेत. झरदारी यांच्या प्रतिस्पर्ध्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेत न केल्याने झरदारी यांचा विजय सोपा झाला.