Pakistan news : पाकिस्तानात लष्कराविरोधात पोलीस रस्त्यावर! चक्काजाम करत आर्मी व आयएसआयला हटवण्याची मागणी-pakistan police stand against army and isi demand to remove from area ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan news : पाकिस्तानात लष्कराविरोधात पोलीस रस्त्यावर! चक्काजाम करत आर्मी व आयएसआयला हटवण्याची मागणी

Pakistan news : पाकिस्तानात लष्कराविरोधात पोलीस रस्त्यावर! चक्काजाम करत आर्मी व आयएसआयला हटवण्याची मागणी

Sep 13, 2024 10:23 AM IST

Pakistan police protest news : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या भागात पोलिस लष्कराविरोधात रस्त्यावर उतरले आहे. गेल्या पाच दिवसांपासून येथील पोलीस संपावर असून येथील लष्कर व आयएसआय गुप्तचर यंत्रणेला येथून हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 शेजारी पाकिस्तानात लष्कराविरोधात पोलीसच उतरले रस्त्यावर! चक्काजाम करत आर्मी व आयएसआयला हटवण्याची मागणी
शेजारी पाकिस्तानात लष्कराविरोधात पोलीसच उतरले रस्त्यावर! चक्काजाम करत आर्मी व आयएसआयला हटवण्याची मागणी

Pakistan police protest news : सध्या पाकिस्तानमध्ये पोलिसदल आणि लष्करामध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये पोलिसांनी अंदोलनाचे हत्यार उपसत चक्काजाम केला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या परिसरातून आयएसआय गुप्तचर यंत्रणा व लष्कराला या भागापासून काढून टाकण्यात यावे अशी मागणी पोलिसांनी करत गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला आहे. ९ सप्टेंबर पासून शेकडो पोलिसांनी सिंधू महामार्ग रोखून धरला आहे. हा महामार्ग पेशावर आणि कराचीला जोडतो. खैबर पख्तुनख्वाच्या लक्की मारवतमध्ये पोलिसांच्या कामात लष्कर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या चक्काजाम आंदोलनात आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते. यामध्ये बन्नू, डेरा इस्माईल खान आणि टँक जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. अनेक राजकीय पक्षही पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले आहे. आयएसआय आणि लष्करी गुप्तचर संस्था या भागातील वातावरण बिघडवत असल्याचं आंदोलक पोलिसांचे म्हणणे आहे. काही पोलिस अधिकाऱ्यांचे अपहरण करून लष्कराने त्यांची हत्या केल्याचं आंदोलक पोलिसांचं म्हणणं आहे.

मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर

पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार, गेल्या वर्षभरात बन्नू, डेरा इस्माईल खान आणि लकी मारवतमध्ये अनेक पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. त्याचबरोबर पोलिसांची कुटुंबे आणि घरांनाही लक्ष्य केले गेले आहे. पाकिस्तानात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस लष्कराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

लष्कराने जिल्ह्यातून निघून जावे व पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या परिसरात शांतता प्रस्थापित केली जाईल, असे देखील पोलिसांनी म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कर तालिबान सारखे वागत आहे. आम्ही ज्या दहशतवाद्यांना अटक करतो लष्कर त्यांना सोडायला सांगतं.

खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात आहे. विशेषत: अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात लष्कराने ताबा मिळवला आहे. तालिबान आणि इतर अनेक संघटनांशी येथे लढाई सुरू आहे. येथील पोलिओ विरोधी पथकासोबतही काम करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. अलीकडेच पोलिओ ड्युटीवर असताना एका पोलिसाची हत्या झाली होती. अलीकडेच खैबर पख्तुनख्वामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पोलिसांना प्राण गमवावे लागले. खैबर पख्तुनख्वामध्ये यावर्षी सुमारे ७५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

Whats_app_banner
विभाग