पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खानयांना जामीन देण्याविरोधात सत्ताधारी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (PDM) चे नेते सुप्रीम कोर्टाच्या बाहेर धरणे आंदोलन करत आहेत. दुसरीकडे इम्रान खान यांना दिलासा देणारे पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल यांना पदावरून हटवण्याची तयारी केली जात आहे.
इम्रान खान यांना काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून पाकिस्तानी रेंजर्संनी अटक केली होती.पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना जामीन मंजूर केला होता. यानंतर पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्षनेते राजा रियाज अहमद खान यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीकास्र सोडलं आहे. इम्रान खान यांना भरचौकात फाशी द्यायला हवी होती, असंही राजा रियाज अहमद खान यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांना जामीन दिला होता. यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नॅशनल असेंब्लीने एक ठराव संमत केला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी पाच सदस्यीय समितीची मागणी करण्यात आली आहे.
दुसरीकडे इम्रान खान समर्थकांकडून सरकारी संस्थांवर हल्ले होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून इम्रान यांना जामीन मिळाल्यानंतर इम्रानविरोधी राजकीय पक्ष एकवटले असून इम्रानच्या सुटकेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करत आहेत. संसदेतही इम्रान यांना फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पाकिस्तान नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान यांनी इम्रान खान यांना भरचौकत फाशी देण्याची मागणी केली आहे. इम्रानच्या सुटकेच्या विरोधात सत्तारुढ पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शने करत आहे. PDM ही सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल (JUIF) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यासह अनेक पक्षांची युती आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सध्या लाहोरमध्ये पुढील सात दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे.