पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शनिवारी इम्रान खान यांचे पंजाब प्रांतातील दोन असेम्बली जागांवरील उमेदवारी अर्ज अवैध ठरवले. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
पाकिस्तानचे ७१ वर्षीय माजी क्रिकेटपटू इम्रान खान एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर लढाईत गुंतले आहेत. ऑगस्ट महिन्यात तीन वर्षाच्या तुरुंगाची शिक्षा सुनावल्यापासून त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात पाहिले गेले नाही.
लाहोरच्या रिटर्निंग ऑफिसरने सांगितले की, पाकिस्तान निवडणूक आयोगाने (ECP) राष्ट्रीय असेंबली मतदारसंघ-लाहोर (एनए १२२) आणि मियानवली (एनए-८९) साठी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर केला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या सायफर प्रकरणात यावर्षी ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर गोपनीय कागदपत्रे लीक केल्याचा आरोप होता. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी इम्रान खान यांना देशाची गुपिते लीक केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. मात्र उच्च न्यायालयाने निवडणुकीत भाग घेण्यापासून त्यांची अपात्रता स्थगित करण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान निवडणूक आयोगाने सांगितले की, इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला आहे. कारण ते मतदारसंघात नोंदणीकृत मतदार नव्हते आणि न्यायालयाने त्यांना दोषी आणि अपात्र घोषित केले आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या जन्मगावी मियानवली येथून निवडणूक लढवण्यासाठी दुसरा उमेदवारी अर्जही दाखल केला होता, मात्र त्यांचा दुसरा अर्जही फेटाळण्यात आला आहे.