मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तानच्या पूरस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं दु:ख, शरीफ यांनी मानले आभार
पाकिस्तानच्या पूरस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं दु:ख, शरीफ यांनी मानले आभार
पाकिस्तानच्या पूरस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं दु:ख, शरीफ यांनी मानले आभार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

पाकिस्तानच्या पूरस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं दु:ख, शरीफ यांनी मानले आभार

01 September 2022, 8:50 ISTSuraj Sadashiv Yadav

Pakistan Flood: पाकिस्तानमध्ये आतापर्यंत महापुरामुळे १ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.

Pakistan Flood: गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानमध्ये महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा महापूर आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या या महापुराने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत महापुरामुळे १ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. वित्त आणि जिवित हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील पूरस्थितीबद्दल ट्विट करताना दु:ख व्यक्त केलं होतं. आता या ट्विटवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील पूरस्थितीनंतर उद्भवलेल्या परस्थितीवर, झालेल्या नुकसानावर शोक व्यक्त केला. तसंच धीर दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अस शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानी जनता या संकटातून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होईल अशी आशाही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानमध्ये पूरस्थितीमुळे प्रचंड जिवित आणि वित्त हानी झाली. याबद्दल दु:ख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेला विध्वंस पाहून खूप दु:ख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या आणि पुरामुळे बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसंच ही परिस्थिती लवकर पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त करतो.”

पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि महापुराने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. सरकारने राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे. महापुरामुले पाकिस्तानमधील ७० टक्के भागाला फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान हे सिंध प्रांतात झाले आहे. पाकिस्तानचं झालेलं नुकसान ४ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापुरात कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तानला 2.6 अब्ज डॉलर किमतीचा कापूस आणि 90 दशलक्ष डॉलर किमतीचा गहू आयात करण्याची वेळ येऊ शकते.