mastermind of Mumbai attack in Pakistan : पाकिस्तान नेहमी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे अनेक पुरावे भारताने जगासमोर आणले आहे. मात्र, पाकिस्तानने हे नेहमी नाकारले आहे. या दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारताविरोधी कारवाया करत असल्याचं देखील उघड झालं आहे. याच प्रकारे पाकिस्तानची पुन्हा एकदा पोल खोल झाली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि २००८ मध्ये मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीउर रेहमान लखवी हा पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्याचं उघडं झालं आहे. लकवी हा जिममध्ये बॉडी बनवताना दिसला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लखवी डान्स क्लासमध्ये सहभागी होताना आणि जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे.
व्हिडिओचे लोकेशन आणि तारीख नेमकी स्पष्ट झाली नसली तरी लखवीने आपला लूक बदलल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. याआधी लकवी हा इस्लामाबादमधील कोर्टाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यावेळी त्याने लांब दाढी ठेवली होती. तर व्हायरल व्हिडिओमध्ये लखवीने दाढी कापलेली दिसत आहे.
२०२१ मध्ये पाकिस्तानच्या एका न्यायालयाने लखवीला दहशतवाद्याना मदत केल्याप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. लखवीवर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. या हल्ल्यात १६० जणांचा मृत्यू झाला होता. लखवीचा मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला होता. पण आर्थिक संकट आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तानला त्याला तुरुंगात पाठवावे लागले होते. त्यानंतर लखवी अनेकदा पाकिस्तानच्या रस्त्यांवर खुलेआम फिरताना दिसला.
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या लखवीला ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे अनेकदा केली आहे. मात्र, पाकिस्ताने याला नकार दिला आहे. मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवाद्यांवर पाकिस्तानात खटला चालवला जाईल असे, पाकिस्तानने म्हटले होते. लखवी आणि अजमल कसाब हे दोघेही पाकिस्तानच्या एकाच भागातील रहिवाशी असल्याचे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीत उघड झालं आहे.
लखवीच्या संभाषणाचे पुरावे अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेले आहे. मात्र, असे असतांना देखील पाकिस्ताने त्याच्यावर कठोर कारवाई केलेली नाही, असे वृत्त पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'ने दिले आहे. लखवीने मुंबईतील ताज हॉटेलमध्ये लपून बसलेल्या हल्लेखोरांना पाकिस्तानात बसून सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होता.
कसाबचा जबाब आणि इतर पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जात नसल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले. ही विधाने भारताच्या दबावाखाली घेण्यात आली आहेत, त्यामुळे कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत ती स्वीकारली जाऊ शकत नाहीत, असे देखील वृत्त आहे. ही माहिती न्यायालयात तपासणीसाठी स्वीकारता येणार नाही, असा दावा करण्यात आला असून या मुद्द्यावरून अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये मतभेद झाल्याचं देखील उघड झालं आहे.
लखवी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी युसूफ मुजम्मिल यांनी मुंबई हल्ल्याचा कट रचला होता, अशी माहिती अमेरिकन व भारतीय तपास अधिकाऱ्यांनी २००९ मध्ये दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली होती. जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्यावर या घटनेतील आरोपींवर खटला चालवत नाही आणि भारतीय भूमीवरील हल्ल्यांशी संबंधित इतर दहशतवादी संघटनांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत त्यांचे समाधान होणार नाही, असे भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, पाकिस्तानने अमेरिका आणि भारताच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवले असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.