Imran Khan : तुफान राजकीय राड्यानंतर इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझर; सुनावणीसाठी कोर्टात होणार हजर
Imran Khan PTI : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Imran Khan News Today : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी अखेर इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान हे लाहोरमधून इस्लामाबादसाठी निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या बंगल्याचे गेट तोडून आत प्रवेश केला आहे. यावेळी बुलडोझरने त्यांच्या बंगल्याच्या भिंती तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी सुरक्षा दल आणि पीटीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळं आता पाकिस्तानमधील राजकीय नाट्याला हिंसक वळण लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच इस्लामाबाद कोर्टानं माजी पीएम इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. परंतु ते कोर्टासमोर हजरच होत नसल्यामुळं पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली होती.
ट्रेंडिंग न्यूज
लाहोरहून इस्लामाबादला निघाल्यानंतर पोलिसांनी जमान पार्कमधील माझ्या घरावर कारवाई सुरू केली असून तिथं कुटुंबातील लोक उपस्थित आहेत. कोणत्या कायद्याद्वारे ही कारवाई केली जात असल्याचं समजत नाही. नवाझ शरीफ यांच्या इच्छेनुसारच कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. नवाझ शरीफ यांनी लंडनमध्ये बसून मला अटक करण्याची योजना आखली असून परंतु कायद्यावर विश्वास असल्यानं कोर्टात हजर राहणार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
इम्रान खान यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात...
न्यायालयात हजर होण्यासाठी इम्रान खान हे लाहोरहून इस्लामाबादसाठी निघाले असता त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांना मोठा अपघात झाला आहे. यावेळी या अपघातात अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. अपघात झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी म्हटलं की, सरकार मला रोखण्याचे प्रयत्न करत असून त्यांना मला अटक करायची आहे. कोणत्याही निवडणुकीत आमच्या पक्षानं भाग घ्यावा, असं त्यांना वाटत नाही. त्यामुळं मी न्यायालयात हजर होणार असल्याचं खान यांनी म्हटलं आहे.