Uttarakhand HIV Positive News: उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये एका १७ वर्षीय एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर १९ हून अधिक तरुणांना एड्सची लागण झाली. संबंधित मुलीला ड्रग्जचे व्यसन होते आणि ती व्यसनासाठी पैसे देणाऱ्या तरुणांशी शारीरिक संबंध ठेवायची, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली. आरोग्य विभागाने चौकशी केली असता सत्य माहिती समोर आली.
एकाच वेळी शहरातील १९ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली. शारीरिक अशक्तपणा, थकवा, तीव्र ताप, डोकेदुखी आदी तक्रारी घेऊन रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या लोकांच्या तपासणीत ते एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. एका एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलीशी शारिरिक संबंध ठेवल्यामुळे १९ जण एचआयव्ही पॉझिटीव्ह झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ३० वर्षांखालील मुलांचा समावेश आहे, तर काही विवाहित पुरुषही आहेत. संबंधित मुलीला ड्रग्जचे व्यसन होते. व्यसन पूर्ण करण्यासाठी ती पुरुषांकडून पैसे घ्यायची, त्याबदल्यात ती त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवायची, असेही सांगितले जात आहे.
एकाच वेळी २० जण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर आरोग्य विभागाने सखोल चौकशी केली. तपासात असे कोणतेही प्रकरण आढळून आलेले नाही. पोलिस तपासानंतरच या सर्वांना एचआयव्हीची लागण कशी झाली? हे स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नैनीताल जिल्ह्याचे सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) डॉ. हरीश पंत सांगतात की, गेल्या एप्रिल २०२४ पासून सहा महिन्यांत १९ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. एका एचआयव्ही मुलीशी शारिरिक संबंध ठेवल्याने त्यांना एड्स झाल्याची माहिती समोर येत आहे. पण हे खरे आहे की खोटे याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यानंतर त्यामागचे सत्य उजेडात येईल.
गेल्या वर्षी २०२३ मध्ये २५ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर, २०२२ मध्ये २४ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. पंत म्हणाले की, केंद्रात जो कोणी तपासणीसाठी येतो, त्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी जीवन जगता यावे, यासाठी संपूर्ण तपासणी, समुपदेशनही केले जाते. सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवली जाते.
संबंधित बातम्या