गाझामध्ये नमाज पठण करत असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलचा हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू-over 100 dead in israeli strike at gaza school idf claims it was hamas base ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गाझामध्ये नमाज पठण करत असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलचा हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू

गाझामध्ये नमाज पठण करत असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलचा हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू

Aug 10, 2024 03:29 PM IST

Israeli Attack Gaza : इस्रायलने गाझामधील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक जण ठार झाले असून डझनभर नागरिक जखमी झाल्याचा दावा गाझा नागरी संरक्षण संस्थेने केला आहे.

इस्त्रायलचा गाझा पट्टीवर हल्ला  (Photographer: Ahmad Salem/Bloomberg)
इस्त्रायलचा गाझा पट्टीवर हल्ला (Photographer: Ahmad Salem/Bloomberg) (Bloomberg)

गाझा पट्टीत इस्त्रायलचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. पॅलेस्टाईनची वृत्त संस्था WAFA च्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार पूर्व गाझापट्टीत विस्थापित लोक रहात असलेल्या एका शाळेला निशाणा बनवून केलेल्या इस्त्रायलच्या हल्लात १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला त्यावेळी झाला जेव्हा लोक नमाज पठण करत होते.

गाझामधील एका शाळेवर इस्रायलने शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक जण ठार तर डझनहून अधिक लोक जखमी झाल्याचा दावा गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने केला आहे. मृतांचा आकडा आता ९० ते १०० च्या दरम्यान असून डझनभर जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या तीन रॉकेटने विस्थापित पॅलेस्टिनींना राहत असलेल्या शाळेवर हल्ला केला, असे एजन्सीचे प्रवक्ते महमूद बासल यांनी एएफपीला सांगितले. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने सांगितले की, या हल्ल्यात १०० हून अधिक शहीद झाले आहेत.

इस्रायलने शाळेवर केलेल्या हल्ल्यामुळे शाळेच्या आवारात भीषण आग लागली असून अडकलेल्या पॅलेस्टिनींना मदत करण्यासाठी बचावकार्य सध्या सुरू आहे. या हल्ल्यादरम्यान काही मृतदेहांना आग लागल्याचे सांगत एजन्सीने हा हल्ला भयानक असल्याचे म्हटले आहे.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि जखमींची सुटका करण्यासाठी कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बसाल यांनी सांगितले. इस्रायलच्या लष्कराने गुरुवारी गाझामधील दोन शाळांवर केलेल्या हल्ल्यात १८ जण ठार झाले होते. त्यावेळी इस्रायली लष्कराने हमासच्या कमांड सेंटरवर हल्ला केल्याचे सांगितले होते.

गाझा शहरातील अल-सहाबा भागातील अल-तबाइन शाळेवर शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, त्यांनी आवारात असलेल्या हमासच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर अचूक हल्ला केला.

इस्रायली प्रशासनाने या भागातील पाणी कपात केल्यामुळे गाझा शाळेच्या आगीत अडकलेल्या महिला आणि मुलांपर्यंत बचाव पथकांना पोहोचता आले नाही.

गाझामधून मिळालेल्या वृत्तानुसार, इमारतीत सकाळच्या प्रार्थनेसाठी लोक जात असताना शाळेवर तीन रॉकेट हल्ला करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान विस्थापित झालेल्या लोकांसाठी या शाळेचा निवारा म्हणून वापर केला जात होता, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, हवाई हल्ल्यात ठार झालेल्या शाळेच्या आतून दहशतवादी आपली कारवाया चालवत होते. नागरी जीवितहानीची शक्यता कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचे लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.